अहमदनगर - विक्री करण्याच्या उद्देशाने ६ गावठी कट्टे व १२ जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगणारे दोन सराईत आरोपी अहमदनगरमध्ये पकडण्यात आले ( Illegal Pistols Seized In Ahmednagar ) आहेत. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली ( Ahmednagar LCB Action ) आहे. ऋषीकेश बाळासाहेब घारे (वय २१, रा. पारेगाव बु., ता. संगमनेर, समाधान बाळासाहेब सांगळे ( वय २७, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आरोपींची नावे असल्याची माहिती मंगळवारी (दि.१५) पञकार परिषदेत अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल ( IPS Saurabhkumar Agarwal ) यांनी दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेतील पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस महानिरीक्षकांच्या सूचना
अवैधरित्या अग्नी शस्त्रे बाळगणाऱ्यांच्या विरूद्ध कारवाई करा, असे आदेश नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना सूचना दिल्या होत्या. याबाबत कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मार्गदर्शन करून कारवाईबाबत सूचना दिल्या.
कोल्हार गावच्या शिवारात सापळा
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील अवैधरित्या गावठी कट्टे बाळगणांची माहिती घेत असतांना दि. १४ फेब्रुवारीला निरीक्षक कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की, कोल्हार ( ता. राहता ) गावच्या शिवारात अहमदनगर- मनमाड रोडवर हॉटेल जनता जवळ ऋषीकेश बाळासाहेब घारे, रा. संगमनेर (ता. संगमनेर) व त्याचा साथीदार असे दोघेजण त्यांच्या जवळील काळे रंगाचे पिशवी (सॅक) मध्ये देशी बनावटीचे गावठी कट्टे व काही जिवंत काडतूस विक्रीसाठी घेऊन येणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती होती. याबाबत विशेष पथकाला पोनि. कटके यांनी मार्गदर्शन करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. माहिती प्रमाणे संबंधित ठिकाणी सापळा लावून थांबले असतांना दोघे मनमाड रोडकडून जनता हॉटेलकडे पायी येत असतांना दिसले. ते दोघे हॉटेल जनताचे समोरील असलेल्या झाडाच्या कडेला संशयरित्या उभे राहिले. त्यातील एका इसमाचे पाठीवर एक काळे रंगाची पिशवी (सॅक) होती. खात्री होताच एकास जागीच ताब्यात घेऊन त्याला माहिती विचारली असता प्रथम उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला व दुसरा पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्याला पथकाने शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिकची कसून चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे ऋषीकेश बाळासाहेब घारे (वय २१ वर्षे, रा. पारेगाव बु, ता. संगमनेर), समाधान बाळासाहेब सांगळे (वय २७, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे सांगितले.
अंगझडतीत मिळाला मुद्देमाल
पोलीस पथकाने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता ऋषीकेश बाळासाहेब घारे याचे कंबरेला पँटचे बेल्टमध्ये खोसलेले १ देशी बनावटीचे गावठी पिस्टल मिळून आले. तसेच समाधान बाळासाहेब सांगळे याच्या पाठीवर असलेल्या काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ५ देशी बनावटीचे गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व १२ जिवंत काडतूस मिळून आले. असा एकूण ६ गावठी कट्टे (अग्नीशस्त्र) व १२ जिवंत काडतूस असा १ लाख ८६ हजार १०० रुपये किमतींचा मुद्देमाल मिळून आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ताब्यात घेतलेल्या आरोपीविरुद्ध विशेष पथकातील पोहेकॉ.मनोहर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात गुरनं. ६०/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्देमाल व आरोपी लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील कारवाई लोणी पोलिस हे करत आहेत. आरोपींवर वेगवेगळया पोलीस ठाण्यात दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, गैरकायदयाची मंडळी जमवून दुखापत करणे, अनाधिकाराणे घरात प्रवेश करणे असे गंभीर स्वरुपाचे ५ गुन्हे दाखल आहेत. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकाॅ. मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, भाऊसाहेब कुरुंद, संदिप घोडके, विश्वास बेरड, पोना. ज्ञानेश्वर शिंदे, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, लक्ष्मण खोकले, पोकाॅ.सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.