ठाणे - बदलापूर रेल्वे स्थानकावर एका तरुणीने लोकलसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सदर तरुणीचे प्राण वाचले आहेत. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
हेही वाचा... लहान भावाचा सांभाळ की शिक्षण ? रेश्माने निवडला 'हा' पर्याय
बदलापूर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकात सोमवारी सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणी रेल्वे फलाट क्रमांक १ वरून रुळावर उडी घेतली आणि समोरून येणाऱ्या लोकलखाली आत्महत्या करण्यासाठी उभी राहिली. मात्र, समोरून येत असलेल्या लोकलमधील मोटरमनचे त्या मुलीकडे लक्ष गेले. त्यांनी मुलगी आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर उभी असल्याचे ओळखले आणि प्रसंगावधान दाखवत रेल्वे वेळीच रोखली. अशोक कुमार असे या मोटरमनचे नाव आहे.
मोटरमनच्या सतर्कतेमुळे लोकल वेळेत थांबली आणि तरुणीचा जीव बचावला. यानंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी घटनस्थळी दाखल होत, अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिची विचारपुस केली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांना बोलावून तिला त्यांच्या स्वाधीन केले.
हेही वाचा... कोरोनाचा 'स्मार्टफोन'ला विळखा; देशातील उद्योगावर परिणाम होण्याची भीती