मीरा भाईंदर - शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. यामुळे रुग्णालयाची कमतरतेमुळे पालिका प्रशासनाने एक 80 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. यासंदर्भात खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी कोविड सेंटरची पाहाणी केली. लवकरच कोविड सेंटर सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिलीप ढोले यांनी दिली.
उत्तनवासीयांना दिलासा -
उत्तन परिसरातील नागरिकांसाठी डोंगरी चौक येथे कोविड सेंटर उभारणीसाठी खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांसोबत पाहणी दौरा केला, मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात भाईंदर पश्चिमेकडील उत्तन येथील नागरिक मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. या परिसरात मच्छीमार व्यवसायिकांची ये-जा अधिक असल्याने याठिकाणी कोरोना चा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यामुळे येथील गरीब मच्छिमारांना शहरात बेड उपलब्ध होत नसल्याने ते घरात उपचार घेतात. यामुळे त्या कुटुंबातील इतरांना ही कोरोनाची लागण होत होती. प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उत्तन परिसरातील डोंगरी, चौक, पाली येथील स्थानिकांसाठी खासदार विचारे यांनी नुकताच महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या सोबत नव्याने होत असलेल्या कोविड सेंटर उभारणीसाठी पाहणी दौरा आयोजित केला होता. पाहणी दौऱ्यात 80 बेडचे रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची आयुक्तांनी माहिती दिली.
पालिका मुख्यालयात बैठक -
खासदार राजन विचारे यांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे भेट घेऊन नव्याने बसविण्यात येणाऱ्या 175 जंबो सिलेंडरची पाहणी केली. त्यानंतर कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर महानगरपालिका येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण शहरातील कोविडच्या स्थितीबद्दल माहिती घेण्यात आली. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण, मृत्यूदर, दररोज होणाऱ्या चाचण्या, ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्सची माहिती घेतली. मिरा भाईंदर मधील इतर रूग्णालयात असलेल्या सुविधांबाबत माहिती घेतली. रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध रुग्णवाहिका, अँटिजेन टेस्ट, कोविड वॉररूम आदी विषयांवर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत पालिका आयुक्त दिलीप ढोले आमदार गीता जैन, विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील सेनेच्या गटनेत्या नीलम धवन सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालिकेची उत्कृष्ट कामगिरी खासदार विचारे -
मीरा भाईंदर शहरात खूप चांगल्या प्रकारे कोरोनाचा परिस्थिती प्रशासन हाताळत आहे. शहराचा मृत्यूदर २.३७ टक्के असून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सर्व अधिकारी वर्गा सोबत बैठक घेण्यात आली, यामध्ये कोविड सेंटरमध्ये असलेली कमतरतेच्या विषयावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.