ठाणे - खरेदीच्या बहाण्याने दुकानात चोऱ्या करणाऱ्या महिला ग्राहकांच्या कारनाम्याने व्यापारी बेजार झाले आहेत. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील भांड्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या महिलांची चित्रफीत व्हायरल झाली आहे. याप्रकरणी अज्ञात माहिलांविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात 2 जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्याने 1 जुलै रोजी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची रिघ लागली होती. या गर्दीचा लाभ उठवत काही अज्ञात महिला ग्राहकांनी दुपारच्या सुमारास भांड्यांच्या दुकानांमध्ये तब्बल 6 हजारांची भांडी लांबवल्याची तक्रार सुरेश कोठारी या व्यापाऱ्याने ठाणे नगर पोलिसात केली आहे.
दुकानातील स्टॉकमधील काही भांडी सापडत नसल्याने त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. तेव्हा, या चोरीचा उलगडा झाला. व्हायरल झालेल्या चित्रणात एक महिला दोन दुकानात भांडी लंपास करताना दिसून येत असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.