ठाणे - कोरोनाचा कहर जसा जसा वाढला, तसतसा शासनाचा भोंगळ कारभार देखील चव्हाट्यावर येऊ लागला आहे. एका शिक्षिकेने एका व्हिडिओद्वारे मानपाडा "एक्मे इमारतीतील" क्वारंटाईन सेंटरची जबरदस्त पोलखोल केली आहे. गेल्याच महिन्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व क्वारंटाईन सेंटरचा दौरा करुन तेथील नागरिकांची व्यथा जाणून घेऊन जेवणाचे ठेकेदार आणि इतरांना सज्जड दम भरला होता. परंतु काही दिवसातच सगळीकडे पुन्हा एकदा ढिसाळ कारभार दिसू लागला आहे.
मानपाडा येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका असणाऱ्या महिलेने त्यांच्या कुटुंबीयांच्या दुर्दैवाचा पाढाच वाचला आहे. निकृष्ट आणि अपूर्ण जेवण, डॉक्टर आणि इतर स्टाफ गैरहजेरी यामुळे येथील सर्व नागरिक प्रचंड त्रस्त झाल्याचे त्या म्हणाल्या. प्रशासनाने या सगळ्यावर लक्ष देऊन परिस्थितीत बदल करावा अन्यथा लोकांच्या रागाचा उद्रेक होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
एकीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासन नवनवीन रुग्णालय तयार करत आहेत. पण त्या रुग्णालयात सुविधा काही केल्या मिळत नाहीत. अशा वेळी आजारपण कमी होण्यापेक्षा वाढेल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. या विलगिकरण कक्षात घरासारख्या सुविधा देवू नका, पण किमान आवश्यक असलेल्या गोष्टी द्याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत. या विलगिकरण कक्षात कोणत्याही प्रकारे स्वच्छता राखली जात नाही. अन्न निकृष्ठ दर्जाचे असते. मात्र तरीही हॉटेलपेक्षा जास्त बिल कंत्रादाराकडून घेतले जात आहे. त्यामुळे या सर्व बाबी महापालिका प्रशासनाने लक्षात घ्याव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
डॉक्टर सुद्धा पाहायला येत नाहीत
या विलगिकरण कक्षात डॉक्टर रुग्णांना पाहण्यासाठी येत नाहीत, असा आरोप नागरिक करत आहेत. दुसरीकडे खासगी रुग्णालयात लाखो रूपयांची बिले दिली जात आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनी करायचे काय, सरकार आमच्याकडे लक्ष देईल का, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.