ठाणे - शहरात लवकरच जलवाहतूक सुरू होणार आहे. केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्र्यांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंत या वाहतुकीचा पहिला टप्पा सुरू करण्याचे आदेशच दिले आहेत. बुधवारी या संदर्भात दिल्लीत एक बैठक झाली. ज्यात ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मंडविया यांच्यासमोर या प्रकल्पाची माहिती दिली.
वसई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांना जलमार्गाने जोडण्यात येणार आहे. त्यासाठी जेट्टी उभारणे, तीन वर्षे बोटींची दुरुस्ती आणि देखभाल, रिव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम विकसित करणे यासाठी 86 कोटी रुपये निधी लागणार आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली या शहरांना असलेल्या खाडी आणि नदीचा फायदा करून अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्याचे केंद्रीय जलवाहतूक मंत्रालायचे प्रयत्न आहेत. ज्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील भार कमी होईल. सध्या याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या ठाणे खाडी परिसरात जलवाहतुकी संदर्भात महत्वाचे काम सुरू आहे.