ठाणे - केंद्र सरकारने काही अटी आणि शर्थी लागू करत सर्व मजूर वर्गाला आपल्या घरी जाण्याची मुभा दिली आहे. स्थानिक डॉक्टर यांच्याकडून फिटनेस प्रमाणपत्र आणि पोलीस स्थानकातून ना हरकत दाखला घेऊनच त्यांना गावी जाता येणार आहे. आज सकाळपासूनच ठाणे पूर्व येथील कोपरी भागात दवाखान्यांबाहेर स्थलांतरितांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या.
राज्यभरात लागू असलेल्या संचारबंदीमुळे कोट्यवधी गोरगरीब स्थलांतरित मंजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. 22 मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे या कामगारांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासनाकडून दोन वेळचे अन्न मिळत असले तरी या कठीण समयी कुटुंबापासून दूर राहिल्याने त्यांच्यात नैराश्य आले आहे. मात्र, नियमानुसार स्थलांतरितांना गावी जाण्यासाठी फॉर्म भरून त्यावर डॉक्टरांचा शिक्का घेतला तरच त्यांना गावी जाता येणार आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी केली होती.
सगळ्या गदारोळात सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडालेला दिसत असून कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. मा, या सगळ्यात घरी जायला मिळत आहे म्हणून, स्थलांतरित मंजूर मात्र बेहद्द खुश झाल्याचे दिसत आहे.
आपल्या गावी जाण्यासाठी आतुर असलेल्या मजुरांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र, हाताला काम नाही आणि खिशात पैसे नाही अशी वेळ आल्यामुळे त्यांनी गावी जाणे पसंत केले आहे. उडिसा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या भागातील मजूर संख्या मोठी आहे.