ठाणे - शहरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनावर पेट्रोलने भरलेले फुगे फेकून कार जाळली आहे. ही घटना उल्हासनगर मधील गोल मैदान परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीपीई किट्स अंगात घालून २ अज्ञात आरोपींनी पहाटेच्या ३ च्या सुमारास वाहनाला आग लावली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात समाजकंटकविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पंकज त्रिलोकांनी यांची कार जाळण्याची ही दोन वर्षातील दुसरी घटना आहे. एका वर्षांपूर्वी सुद्धा कार जाळल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, मात्र, आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही, अशी माहिती त्रिलोकांनी यांनी दिली. कार जाळण्याचा प्रकाराने पंकज प्रचंड घाबरले आहेत. माझ्यासह परिवाराला मानसिक व शारिरीक छळ करण्याचा प्रकार असल्याचे पंकज त्रिलोकांनी यांनी सांगितले.
गॅंगस्टर पुजारीने देखील पंकज त्रिलोकांनी यांना खंडणीसाठी धमकी दिली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री ३ वाजता पीपीई किट्स घालून आलेल्या दोघांनी इमारतीच्या पार्किंग केलेल्या कारवर पेट्रोलने भरलेली फुगे फेकून आग लावली. आगीत कार काही प्रमाणात जळाली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
हेही वाचा- जळगावात कोरोना लसीकरणाचा 'ड्रायरन', 25 आरोग्य कर्मचाऱ्यांची रंगीत तालिम