ठाणे - अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड ( Ambrnath Malanggad ) परिसरात मित्रांसोबत पिकनिकसाठी गेलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू ( Two Drowned In River ) झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मलंगगड परिसरातील आंभे गावाजवळील नदीत हे तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. दोन्ही तरुणांचे मृतदेह बचावपथकाच्या लागले आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात ( Hill Line Police Station ) घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अंकित जयस्वाल आणि निखिल कनोजिया (१७) असे नदी पात्रात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले - मलंगगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंभे गावाजवळून वाहणाऱ्या नदीला मोठा प्रवाह आला आहे. आज दुपारच्या सुमारास डोंबिवलीहून १२ जणांचा एक ग्रुप या परिसरात पिकनिकसाठी आला होता. यावेळी आंभे गावाजवळील नदीत हे तरुण पोहण्यासाठी उतरले. मात्र त्यांना नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने यापैकी अंकित जयस्वाल आणि निखिल कनोजिया हे दोन तरुण नदीत बुडाले. यावेळी स्थानिकांनी तिथे धाव घेत या तरुणांचा शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह आढळून आले.
गेल्या पावसाळ्यात नदीत बुडून ६ जणांचे मृत्यू - मलंगगड परिसरात मागच्या वर्षी पावसाळ्यात नदीत बुडून ६ जणांचे मृत्यू झाले होते. तर यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच २ तरुणांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर तहसीलदारांनी ३१ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू केले आहे. असे असतानाही हा ग्रुप या परिसरात कसा आला? त्यांना पोलिसांनी अडवलं कसं नाही? असा प्रश्न यानंतर निर्माण झाला आहे.
मनाई आदेशानंतरही पोहोचले कसे - ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातील विविध पर्यटन स्थळांवर येथील तहसीलदारांनी 31 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश जारी केलेले आहेत. तरीही हा 12 तरुणांचा ग्रुप या ठिकाणी भटकंतीसाठी आला होता. हा ग्रुप येथे कसा आला, यांना कोणीही अडविले कसे नाही, हा ग्रुप येथे आला त्यावेळी कोणते पोलिस ड्युटीवर होते, त्यांना अडविले कसे नाही, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. यादृष्टीने पोलीस आता तपास करीत आहेत.
हेही वाचा - Raosaheb Danve : शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचा खळबळजनक दावा