ठाणे - वनविभागाने ठाणे परिसरात दोन पोपट तस्करांना अटक केली आहे. हे तस्कर विवियाना मॉलजवळ प्रतिबंधित प्रजातीच्या पक्षांची विक्री करण्यासाठी आले होते. दोघांनाही वनविभागाने शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन दुर्मीळ पोपट जप्त केले.
भारतात दुर्मीळ पशुपक्षी पाळणे आणि खरेदी-विक्रीवर बंदी आहे. मात्र जंगली पशुपक्षांची तस्करी हा भारतात कोट्यवधी रुपयांचा व्यापार आहे. अनेकजण आपल्या मनोरंजनासाठी आणि अंधश्रद्धेपोटी तस्करांकडून पशुपक्षी विकत घेतात. असाच एक सौदा करण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना ठाणे वनविभागाने अटक केली. अद्याप कारवाई सुरू असल्याने आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नाहीत.
88 पशुपक्ष्यांची सुटका
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपींकडे कसून चौकशी केली. तर दोघांनी लपवून ठेवलेले अनेक प्रजातीचे दुर्मीळ पोपट, कासवं अशा एकूण 88 पशुपक्षांची सुटका केली. दोन्ही आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
उप वनसंरक्षक ठाणे, सहा वनसंरक्षक गिरीजा देसाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल संजय पवार, हेमंत कारंडे, वनरक्षक दत्तात्रय पवार यांच्या पथकाने ठाण्यातील वन्यजीव कल्याण संघटनेच्या सहाय्याने ही कारवाई केली.
हेही वाचा-देशातील पहिल्या सी-प्लेन सेवेला सुरूवात होणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उद्घाटन
हेही वाचा- काळ्या फिती लावून मंत्रिमंडळ देणार सीमावासीयांना पाठिंबा- एकनाथ शिंदे