ठाणे - कल्याण डोंबिवली महापालकेची स्थापना झाल्यापासून महापालिका नेहमीच काहींना काही वादात राहिलेली आहे. पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये लाच घेण्यासाठी जणू स्पर्धा लागल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे लाचखोरांचे माहेरघर म्हणून ओळख निर्माण झालेल्या महापालिकेत पुन्हा दोघे लाचखोर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. भागाजी भांगरे, असे लाच प्रकरणी अटक केलेल्या प्रभाग अधिकाऱ्याचे नाव आहे. तर सुहास मढवी, असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.
लाचखोर भांगरे हे महापालिकेच्या 'क' प्रभाग क्षेत्राचे प्रभाग अधिकारी होते. तर त्यांच्यासोबत लाचखोर मढवी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. या दोघा लाचखोरांनी कल्याण पश्चिम भागातील ठाणकरपाडा येथील एका अनधिकृत उभारलेल्या चाळीतील खोलीवर कारवाई रोखण्यासाठी तक्रारदार यांना २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती १५ हजार देण्याचे ठरले. दरम्यानच्या काळात तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत विभागात धाव घेऊन लाचखोरांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार काल सायंकाळच्या सुमारास दोघांनाही १५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालिका स्थापनेपासून म्हणजे ३८ वर्षात ४१ लाचखोरांवर कारवाई करण्यात आल्याने महापालिकेला भष्ट्रचाराची कीड लागली आहे. त्यातच कोरोनाच्या काळातच लाचखोरीचे प्रकरण समोर आल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेत खळबळ उडाली आहे.
लाचखोरीची सुरुवात प्रशासकीय राजवटीतच-
कल्याण महापालिका १ ऑक्टोबर १९८३ ला स्थापना झाली. त्यानंतर एक तप म्हणजे १२ वर्ष प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर १९९५ मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. लोकप्रतिनिधीची राजवट आल्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक श्रीधर म्हात्रे यांनी कल्याण-डोबिंवली महापालिका, असे नामकरण करण्यासाठी डोंबिवलीतील सर्व पक्षीय नगरसेवकांना घेवून आंदोलन केले होते. त्यानंतर १९९६ साली कल्याण महापालिकेचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, असे नामकरण करण्यात आले. मात्र, लाचखोरीची सुरुवात प्रशासकीय राजवटीत सुरू झाली होती.
लाचखोरांच्या यादीत अतिरिक्त आयुक्तही-
महापालिकेचा पहिला लाचखोर म्हणून अनधिकृत बांधकाम विभागात (सुपरवायझर) असलेल्या तुकाराम संख्ये ठरला. त्याला एप्रिल १९९५ साली १ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लाचखोरीला सुरुवात होवून आजपर्यत ४१ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. या लाचखोरांच्या यादीत अतिरिक्त आयुक्त संजय घरत (५१) यांचाही समावेश झाला. १३ जुलै २०१८ रोजी अनधिकृत बांधकाम कारवाई न करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
लाचेच्या स्वरूपात महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी-
धक्कादायक बाब म्हणजे 'क' प्रभागातील रमेश राजपूत नावाच्या लिपिकाने चक्क लाचेच्या स्वरूपात एका महिलेला शारीरिक सुखाची मागणी केल्याने उघड झाले होते. मात्र पालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेना व भाजप युतीच्या धोरणामुळे कायद्याची पळवाटा काढून ३५ लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीमध्ये येण्याची संधी देण्यात आल्याचे दिसून आले. तसेच आजही डझनभर लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे.
१ अधिकारी २ वेळा, तर दुसरा तीन वेळा लाखोंची लाच घेताना अटक-
लाचखोरीच्या या प्रकरणात १ अधिकारी २ वेळा तर दुसरा तीन वेळा लाखोंची लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. त्यामध्ये कार्यकारी अभियंता सुनील जोशी व कोरोना काळातच सेवानिवृत्त झालेले सहाय्यक आयुक्त गणेश बोराडे, अशी त्यांची नावे असून सुनील जोशी पालिकेच्या सेवेत पुन्हा रुजू झाले आहेत. तर अतिरिक्त आयुक्त संजय घरत हा बडा अधिकारी लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्याने कल्याण डोंबिवली महापालिका म्हणजे लाचखोरांचे माहेरघर झाल्याने महाराष्ट्रभर बदनामी झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका स्थापनेपासून आजतगायत ३८ वर्षात महापालिकेतील ४१ अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कॉंग्रेस, अपक्ष, भाजपचा असे तीन नगरसेवक लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्याने ही महापालिका लाचखोरांचे माहेरघर झाल्याची चर्चा करदाते नागरिकांमधून होत आहे.
लाचखोरीमुळे बहुतांश नागरी सुविधांचा उडाला बोजवारा-
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आजही लाचखोरी व भष्ट्राचार फोफावत चालला आहे. त्याचे उदाहरण अनेकदा महापालिकेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी सभागृहात पाहावयास मिळाले आहे. कधी विरोधीपक्ष नेते तर कधी सत्ताधारी नगरसेवकच या दोन्ही सभागृहात लाचखोरी, टक्केवारी, भष्ट्राचार या विषयी बोलत असतात. मात्र, त्या मानाने कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आजही ३८ वर्षात महापालिकेच्या क्षेत्रात अनेक नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा- 'द व्हाईट टायगर'सह या चित्रपटांचे ऑस्करसाठी नामांकन