ठाणे - संचारबंदी काळात ठाणे पोलीस आयुक्तालयातील वागळे इस्टेट परिमंडळात वाहतूक पोलिसांनी शनिवारी 55 रिक्षा व 22 दुचाकी जप्त करून कारवाईचा बडगा उगारला. अप्रिय कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी घरीच थांबण्याचे आवाहन वागळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन ठाणे पोलिसांकडून वारंवार केले जात असतानाही अनेक जणांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे पोलीस आयुक्तालयामधील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या 5 परिमंडळांतील 35 पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ठाण्यातील राबोडी, मुंब्रा आणि कळवा तसेच भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरच्या काही भागांमध्ये राज्य राखीव दलासह (एसआरपीएफ), शीघ्रकृती दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या ठाणे रेड झोनमध्ये आहे. तरीही, अनेकजण विनाकारण वाहने घेऊन घराबाहेर पडत आहेत.
ठाणे रेड झोनमध्ये असल्यामुळे येथे रिक्षा व्यवसायाला प्रतिबंध असताना बेधडकपणे रिक्षा वाहतूक सुरू आहे. त्यामुळे शनिवारी वागळे परिमंडळातील वाहतूक पोलिसांनी नितीन कंपनी जंक्शन, कॅडबरी सिग्नल येथे 55 रिक्षा व 22 दुचाकी अशा 77 वाहनांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती गावडे यांनी दिली.