ठाणे - काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Congress Against PM Modi) यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा होऊन मुलुंड येथील खासदार मनोज कोटक (MP Manoj Kotak) यांच्या कार्यालयावर जाणार होते. भाजपने देखील काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी मोठी तयारी केली होती. यामुळे मुलुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. याचा परिणाम मुलुंडच्या वाहतुकीवर झाला (Traffic in Mulund) आहे. हे आंदोलन सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मुलुंडच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
भाजपचे नेते राम कदम, मनोज कोटक, मिहिर कोटेचा आणि भाजपाचे अनेक कार्यकर्ते सकाळपासून मुलुंडच्या भाजपा कार्यालयात ठाण मांडून होते, तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे, चरणसिंग सप्रा हे आपल्या कार्यकर्त्यांसह मोर्चा काढून मनोज कोटक यांच्या कार्यालयावर धडकले. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने येऊन भिडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले. त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला. मात्र, या संपूर्ण प्रकारानंतर या संपूर्ण परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या सर्व आंदोलनांचा निषेध या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या नागरिकांनी केला आहे.
मोदींनी माफी मागावी
या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. मोदींनी माफी मागावी अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडली, तर भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांचे फोटो जाळले.
भाजपच्या खासदारांना महाराष्ट्र माफ करणार नाही -- लोंढे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना महाराष्ट्राने कोरोना पसरवला असे म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला, असा आरोप करत या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहे. मात्र दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत, म्हणून ते काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुतळे जाळत आहेत, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली.