ठाणे - उडण्याची वेगळी लकब आणि आक्रमकता दाखवत इतर पक्ष्यांना हद्दीत पाऊल ठेवण्यास मज्जाव करण्यासाठी कायमच अग्रेसर असणाऱ्या सीगल्सचा दरारा बघण्याजोगा ( Seagulls Birds Are Point of Attraction ) असतो. परंतु ठाण्याच्या खाडी किनारी किंवा मासुंदा तलावात ( Lakes in Thane city ) नागरिकांच्या विचित्र सवयीमुळे सिगल्स पक्षी लाचार झालेले दिसत ( Seagulls Arrival Thane ) आहेत. फेरफटका मारण्यासाठी येणारे लोक सीगल्सना पाव, बिस्किट, फरसाण सारखे खाद्य फेकत असून, हे खाद्य खाण्यासाठी पक्षी आतुर झालेले दिसतात. काहीवेळा बैठकीच्या आसनावर हा पक्षी विराजमान झालेला दिसतो. खाणं देताना देताना वेगळा आनंद मिळत असतो. मात्र, पक्ष्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे संकेत असल्याचे पशुमित्र सांगतात.
सीगल्सने मांडले बस्तान
ठाण्यात गारव्याची दुलई चांगलीच बहरली असताना शहराच्या विविध भागात स्थलांतरीत पक्ष्यांचे थवे घोंगावताना दिसतात. उत्तर भारत, आशिया, युरोप तसेच अफ्रिका खंडातून हजारो किमीचा प्रवास करुन येणाऱ्या पक्ष्याची वेगळीच ऐट असलेल्या सीगल्स या पक्षाला बघण्याची नजाकत काही औरच आहे. सध्या ठाणे खाडी किनारी आणि मासुंदा तलावात सिगल्सने बस्तान मांडलेले आहे.
समुद्री चाचे असेही नाव
या पक्षांना हवे असलेले थंड वातावरण जस जसे बदलते तेव्हा हे पक्षी समुद्री मार्गे पुन्हा आपल्या घरी परत जातात. हे जाताना आणि येताना समुद्री मार्गाचा वापर करतात आणि त्यांचे थवे हे समुद्री चाचे असल्याचे जहाज आणि बोटींना वाटतात. कारण उडताना दमल्यानंतर ते या बोटींवर थोडा वेळ विश्रांती घेतात. या सिगल पक्षाला दिलेले समुद्री चाचे हे नाव त्याच्या या वागण्यामुळे प्रत्यक्षात असल्याचे भासते कारण त्यांच्या थव्यात दुसरा कोणताही पक्षी घुसू शकत नाही.
नागरिकांनी दिलेले अन्न ठरतंय घातक
भक्ष्याला पकडण्यासाठी घिरट्या घेताना, मध्येच पाण्याच्या दिशेने सूर मारताना या पक्ष्याची ऐट बघण्याजोगी असते. मात्र, माणसाने फेकलेल्या खाद्याला पक्षी भुलत आहेत. या पक्ष्यांना बिस्किट, पाव, फरसाण सारखे पदार्थ पोषण आहारासाठी त्रास दायक ठरु शकत असल्याची माहिती पशु- पक्षी मित्र प्रशांत सिनकर यांनी दिली. ठाणे मासुंदा तलाव येथून आढावा घेत पक्षी मित्र प्रशांत सिनकर यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी..