ठाणे - घोडबंदर येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही गेलो असताना त्या हल्लेखोराने माझ्यावर पाठमागून जीवघेणा हल्ला केला असून त्यामध्ये मी सुदैवाने बचावली, मात्र माझी बोटे निकामी झाली असून मी लवकरच बरी होऊन पुन्हा माझे कर्तव्य बजावण्यासाठी रस्त्यावर उतरणार, अशी प्रतिक्रिया माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी दिली. अशा हल्ल्यांना आम्ही घाबरणार नसून पुन्हा आम्ही उभे राहू, असे कल्पिता पिंपळे यांनी सांगितले. पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा - ठाण्यात गायिका फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला गर्दी; कोरोनाचे नियम पायदळी
ठाणे शहरातील सहाय्यक आयुक्तावरील हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांनी शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात संताप व्यक्त करून सहाय्यक आयुक्तांची पाठराखण केली आहे. तर जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हल्लेखोरावर कारवाई करण्याचे, तसेच अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी व्यापक उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली.
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करून फेरीवाल्यांच्या मुजोरीला वेळीच वचक बसवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तर, भाजप, काँग्रेस, मनसेकडूनही या घटनेचा निषेध करून फेरीवाल्यांविरोधात व्यापक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, ठाणे शहरातील सर्वच घटकांकडून महापालिका अधिकाऱ्यावरील हल्ल्याविरोधात व्यापक आवाज उठवण्यात आला.
महिला अधिकारी शांत बसणार नाहीत
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका, भिवंडी महापालिकेसह जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच, अशा हल्ल्यांना घाबरून महिला शांत बसणार नसून दुप्पट वेगाने या विरोधात कारवाई करतील, असा विश्वास महिलांनी व्यक्त केला. तसेच, संबंधित हल्लेखोरावर जलदगतीने कडक कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी महिलांकडून करण्यात आली.
हल्ल्यानंतर महापलिकेची 'सुसाट' कारवाई
सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतरही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशाने मंगळवारी शहरातील विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत नौपाडा - कोपरी प्रभाग समितीमधील ठाणे स्टेशन, सॅटिस परिसर, जांभळी नाका, नौपाडा आणि गावदेवी मंदिर परिसर, तसेच कळवा प्रभाग समितीमधील कळवा स्टेशन पूर्व, कळवा भाजी मार्केट, सहकार बाजार, कळवा नाका, खारेगाव मार्केट व पारसिक रोड परिसर या ठिकाणी असणाऱ्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. दिवा प्रभाग समितीमधील साईधाम अपार्टमेंट, मुंब्रा देवी कॉलनी येथील अनधिकृत इमारतीचे कॉलम बीम व स्लॅब तोडण्यात आला.
मोका कायद्याने कारवाई करा
आज कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन विचारपूस करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे आले होते. त्यांनी अशा आरोपींवर भूमाफिया प्रमाणे फेरीवाला माफिया राज सुरू आहे, त्यामुळे संगठीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी भाजपने आम्ही संजय राऊत यांना गंभीर घेत नाही, असेही सांगितले.
हेही वाचा - सचिन वाझे शस्त्रक्रियेसाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात दाखल..