ठाणे - देशभरात फसवणुकीचे 100 गुन्हे दाखल असलेल्या मुकेश मेनन या कुख्यात लुटारूला कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका बँकेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना मुकेशने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून धूम ठोकली होती. चार राज्यांतील पोलीस विविध गुन्ह्यांसाठी मुकेशच्या मागावर होते. मात्र, मुकेशचा साथीदार दत्ता शिंदे हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
30 ऑगस्टला कल्याण पश्चिमेला संतोषी माता रस्त्यावर असलेल्या एका बँकेत चोरटे येणार असल्याची माहिती स्थानिक पोलीस पथकाला मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. परंतु, चोरट्यांना पोलिसांची चाहूल लागल्याने त्यांनी पोलीस कर्मचारी अमोल गोरे यांच्या अंगावर गाडी घातली; व दोघेही पसार झाले.
यानंतर मुकेश मेनन आणि दत्ता शिंदे या दोघांच्या शोधत पोलीस होते. अखेर पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. यावेळी मुकेश व त्याचा साथीदार दत्ता हे दोघे बँकेबाहेर बतावणी करून बँकेत येणाऱ्या नागरिकांना लुटत होते. मुकेश मेननच्या विरोधात देशभरात तब्बल 100 गुन्हे दाखल आहेत. याआधी त्याला 30 गुन्ह्यांत अटक झाली असून, चार राज्यांचे पोलीस मुकेशच्या शोधात होते. मुकेशने लपण्यासाठी तीन घरे घेतली असल्याचे तपासात समोर आले आहे. सद्या तो स्वत:ची खरी ओळख लपवून शहारत वावरत होता.