ठाणे - एकीकडे सर्व पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढल्याने सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अशावेळी आजपासून सर्वसामान्य नागरिकांची समजली जाणारी लालपरी म्हणजे राज्य परिवहन सेवा 17 टक्क्यांनी महागली आहे.
गाव तिथे एसटी हे ब्रीद वाक्य म्हणत सुरू केलेली परिवहन महामंडळाची एसटी आता महागली आहे. राज्याच्या गावोगावी जाऊन सर्वसामान्य, शेतकरी, नागरिक, व्यापारी, व्यावसायिक अशा सर्वच प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अखेर प्रशासनाला दरवाढ करावी लागली आहे.
डिझेलच्या किंमती वाढल्याने दरवाढ
या दरवाढीमुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यांचा खिसा रिकामा होत असल्याने त्यांनीही नाराजी वक्त केली आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतर वाढलेल्या डिझेलच्या किंमती त्यामुळे पर्याय नसल्याने आधीच डबघाईला आलेल्या या महामंडळाला वाचवण्यासाठी दरवाढ करावीच लागणार होती. मात्र यामुळे नागरिकांनी रोष वक्त केला आहे.
ग्रामीण भागात मोठा रोष
एकीकडे अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली आहेत. शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी एसटीचा मोठा प्रवासी वर्ग हा ग्रामीण भागात आहे. आता हा ग्रामीण भागातील प्रवासी आर्थिक अडचणीला सामोरे जात आहे. तेव्हा केलेली ही दरवाढ मोठ्या रोषाला कारणीभूत झाली आहे.
ऐन सुट्टीच्या काळात दरवाढ
दिवाळी सणानिमित्त गावी जाणे-येणे हे वाढते. त्यामुळे या सणासुदीच्या काळात परिवहन महामंडळाने केलेली दरवाढ सर्वच प्रवाशांना परवडणारी नाही. त्यामुळे आता डिझलचे दर कमी करून ही दरवाढ कमी करावी, अशीच मागणी प्रवासी करत आहेत.