पालघर - जिल्ह्यातील वाळिव पोलीस ठाणे हद्दीतील जामा मस्जीद कामण ट्रस्ट, वसई पुर्व कामण गाव आणि परिसरातील मुस्लीम बांधवांनी बकरी ईदचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी अडीच लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे.
![vasai Muslim brothers have provided financial assistance to flood victims](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-03-kolhapur-and-districts-flood-relief-amounted-vis-mhc10003_16082019221736_1608f_1565974056_951.jpg)
पूरग्रस्त नागरिकांसाठी जमा केलेला अडीच लाख रुपयांचा धनादेश जामा मस्जीद कामणचे अध्यक्ष हजरत हुसेन शेख व इतर सहकाऱ्यांच्या हस्ते वसई पुर्वचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासाठी देण्यात आला.
या वेळी उप विभागिय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील व वाळिव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले, वसई विभागातील अनेक मुस्लीम बांधव उपस्थीत होते. सामाजिक भान जपत घेतलेल्या पुढाकारासाठी विजयकांत सागर यांच्या हस्ते जामा मस्जीद ट्रस्ट कामण गाव अध्यक्ष व समाजसेवक हजरत हुसेन शेख व इतर सदस्यांचा सत्कार करण्यात आला.