ठाणे - शहरातील कोरम मॉल परिसरात राहणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या हनिमूनचा कालावधी कायम स्मरणात राहील असाच झाला आहे. ठाण्यातील ध्रुव देशपांडे आणि त्याची पत्नी क्रिती देशपांडे हे त्यांच्या लग्नानंतर पेरू येथे हनिमूनसाठी गेले आणि त्यानंतर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले.
ध्रुव आणि क्रिती यांचा विवाह 19 जानेवारीला झाला होता. त्यांनी 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत पेरू आणि मेक्सिकोला हनिमूनला जाण्याचे ठरवले होते. 10 मार्च रोजी 26 तासांचा प्रवास करून ते पेरू देशात पोहचले. पेरूमध्ये सहा दिवस राहिल्यावर तिथे कोरानामुळे लॉकडाऊन सुरु झाले. लॉकडाऊनमुळे ठाण्यातील हे नवदाम्पत्य पेरुतच अडकले. देशपांडे कुटुंबीयांनी पुन्हा परत भारतात येण्यासाठी प्रयत्न सुरू केला. पुढे त्यांनी माहिती घेतल्यावर भारतात जाण्यासाठी विमान सेवा बंद असल्याचे त्यांना समजले. त्यावेळीआपण तेव्हा थोडेसे घाबरलो होतो, असे ध्रुव यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... धक्कादायक! औरंगाबादमध्ये बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या
यानंतर त्यांनी भारतीय दुतावासाशी संपर्क केला. तेव्हा, पेरूमध्ये 60 भारतीय अडकले होते. पुढे काय परिस्थिती होईल, या भीतीने फिरण्याचे सर्व बेत रद्द झाल्याने त्यांना तेव्हा आता हॉटेलमध्येच रहावे लागणार होते. त्यावेळी या जोडप्यानेच एकमेकांना धीर देण्याचे काम केले. काही दिवसांनी हा आजार अधिक प्रमाणात वाढल्याचे समोर आले. त्यामुळे आतातरी लवकर परत जाता येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एक घर भाड्याने घेतले.
ध्याणीमणी नसताना अचानकच या दोघांवर मोठी जबाबदारी पडली होती. खरेतर या दोघांची पाच वर्षांची ओळख आणि पुढे लग्न झाले होते. मात्र, या पाच वर्षांत आम्ही एकमेकांना जितके ओळखले नाही, समजून घेतले नाही. तितके या 87 दिवसात समजून घेऊ शकलो, असे ध्रुव देशपांडे यांनी सांगितले.
भारत सरकारच्या ऑपरेशन वंदे मातरममुळे 25 मे रोजी आम्ही पुन्हा भारतात आलो. त्यानंतर मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले तिथे कोरोना टेस्टही करण्यात आली. ती टेस्ट निगेटिव्ह आल्यावर आम्हाला ठाण्यात घरी जाता आले, असे ध्रुव यांनी सांगितले.
पेरुमधील आठवणी या आयुष्यात खूप आनंद देणाऱ्या आणि संकटाला सामोरे जाण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत, असेही ध्रुव यांनी म्हटले आहे.