ठाणे - 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरदरम्यान जवळपास सात जण दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आले आहेत, अशी धक्कादायक माहिती ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. आता प्रवाशांची शोध मोहीम पालिकेने सुरू केली असून, ज्यांच्यात लक्षणे आढळतील त्यांची तपासणी आणि विलगीकरण करण्याचे काम पालिका करणार आहे. डोंबिवलीची घटना ताजी असतानाच ठाण्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रवासी पालिकेला कधीपर्यंत मिळून येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व ठाणे मनपा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम ठाणे महापालिकेने राबवण्यास सुरुवात केली आहे. या सातही जणांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार असून यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमूने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार असल्याचे ठा.म.पा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.
भारतात कोरोनाचा भार एकीकडे ओसरत असताना दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रीया या देशांमध्ये दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमिक्रॉन विषाणूचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. त्यामुळे, केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राज्य सरकार कामाला लागले आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान जवळपास सात जण दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आल्याची धक्कादायक माहिती ठाणे महापालिका आयुक डॉ. शर्मा यांनी सोमवारी दिली. या सात प्रवाशांची शोध मोहीम पालिकेने सुरू केली असून ज्यांच्यात लक्षणे आढळतील त्यांची तपासणी आणि विलगीकरण करण्याचे काम पालिका करणार आहेत.
जिल्हा आरोग्य विभागही सज्ज
नवीन विषाणू हा धोकादायक असू शकतो. पंरतु, या अनुषंगाने तयारी करून याला लढा देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे व प्रशासन सज्ज आहे. औषधी, ऑक्सिजन साठा, तसेच बेड क्षमता वाढवली आहे व काही नवीन रुग्णालये देखील तयार केली आहे. पंरतु, या व्हेरियंटचा प्रादुर्भाव कशाप्रकारे होईल, यावर पुढील गोष्टी निश्चित होतील, असे यावेळी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार म्हणाले. तर, कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तोटा मोठ्या प्रमाणात भासला असल्या कारणामुळे यावेळी ऑक्सिजनचा साठा आणि ऑक्सिजन प्लांट हे तयार आहेत व त्यानुसार ऑक्सिजनची कमतरता यावेळी भासणार नाही, असा विश्वास देखील कैलास पवार यांनी दर्शवला. या तयारी वरून नवीन कोरोना व्हेरियंटला लढा देण्यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालय तूर्तास तरी तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - VIDEO : लग्न सोहळा सुरु असतानाच मंडपाला भीषण आग; २५ वाहने जळून खाक; भिवंडीतील घटना