ठाणे : परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 'वॉक इन' पद्धतीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये आज पहिल्याच दिवशी १९५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लसीचा तुटवडा असल्याने अनेक विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतरच त्यांना परदेशात प्रवेश मिळणार होता. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशनानुसार परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्याची नियोजन केले. त्यानुसार लसीकरण सुरू करण्यात आले असून, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
केवळ ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी ड्राईव्ह..
ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ही 'वॉक इन' लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सदरच्या केंद्रात लस देण्यात येत असून परदेश प्रवेशपत्र, व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करूनच लस देण्यात येत आहे. तरी महापालिका क्षेत्रातील परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी लसीकरणासाठी लवकर स्लॉट मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांनी ठाणे मनपाचे या उपक्रमासाठी आभार मानले.
हेही वाचा : 'रामदास आठवलेजी तुम्ही केंद्रात मंत्री आहात, आता तुम्हीच महाराष्ट्राला मदत आणून द्या'