ठाणे - राज्यात महाविकास आघाडी असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेच सुरू राहिले तर, ठाण्यात महाविकास आघाडी व्हावी, अशा मताचा मी नाही, असे स्पष्ट वक्तव्य ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत केले.
हेही वाचा - Vasant Marathe passes away : ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन
एकहाती सत्ता आणण्यासाठी आम्ही सज्ज असून, कार्यकर्त्यांना कामाला लागा, अशी सूचना देखील म्हस्के यांनी केली आहे. महापौरांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यात महाविकास आघाडी करण्यासाठी शिवसेना इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. महापौरांनी केलेल्या या खळबळजनक विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा ठिणगी पडली असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ठाण्यातील नेत्यांमध्ये आघाडी बिघाडी झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयावरून होणारा वाद आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वापर्यंत येऊन पोहचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली असताना आगामी पालिका निवडणुकीत आघाडी होणार नसल्याची भूमिका रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्यांनी मांडली असून, उड्डाणपुलाच्या वादावर आम्ही पूर्णविराम देतो, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात सेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वातावरण गढूळ झाले असताना मिशन कळवाबरोबर मिशन मुंब्र्याची घोषणा म्हस्के यांनी केली आहे. ठाणे महापलिकेत पुन्हा एकहाती सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे देखील सांगण्यात आले असून. ठाण्यात शिवसेनेचे नगरसेवक वाढवण्याचे आमचे उद्देश आहे. मात्र, सद्या सुरू असलेल्या वादावरून जे चित्र निर्माण केले जात आहे, जे आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत, ते जर असेच सुरू राहणार असतील तर, ठाण्यात आघाडी होऊ नये, या मताचा मी असल्याचे यावेळी म्हस्के यांनी स्पष्ट केले.
मस्के यांच्याकडून 'एकला चलो रे' चा संकेत
युतीबाबत निर्णय वरीष्ठ नेते घेणार असले तरी, महापौर आणि ठाण्याचा जिल्हा प्रमुख म्हणून माझे मत युतीच्या बाजूने नाही, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या नगरसेवकांचे देखील हेच मत असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली. त्यामुळे, भविष्यात ठाण्यात महाविकास आघाडीचा बोलबाला असणार की, बिघाडीचा डंक्का वाजणार, हे पाहावे लागेल.
हेही वाचा - MLA Pratap Sarnaik : एक इंचही अवैध बांधकाम नसल्याने राज्य सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह - प्रताप सरनाईक