ठाणे - शहरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. करोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी व करोनाबाधितांची वाढती संख्या अटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिका सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी ‘प्लाझ्मा’ थेरपीचा देखील वापर केला जात आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा डोनेशनद्वारे पॉझिटिव्ह रुग्णांना जीवनदान देण्यासाठी ठाण्यातील माजी नगरसेविका, प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले - जाधव यांनी प्लाझ्मा डोनेशन केले. मुंबईच्या नायर रुग्णालयात ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून भविष्यातही अशाच पद्धतीने प्लाझ्मा डोनेशन करून कोरोना रुग्णांना आधार देणार असल्याचे जाधव यांनी नमूद केले.
कोरोनाकाळात तीन महिन्यांपासून सक्रियपणे समाजकार्य करणाऱ्या माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव या काळात कोरोना पाॅझिटिव्ह आल्या. या आजारातून सुखरुप घरी परतलेल्या जाधव यांनी कोरोना रुग्णांच्या व्यथा उपचारादरम्यान 'याची देही याची डोळा' पाहिल्या होत्या. त्यातून जाधव यांनी प्लाझ्मा डोनेशनची तयारी दर्शवली. हा विचार त्यांनी शिवसेना नगरसेवक, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांच्याकडे बोलून दाखवला. जाधव यांच्या या निर्णयाचे स्वागत करुन रेपाळे यांनी त्यांना ठाणे पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागातील अधिकार्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार जाधव यांनी डाॅ. चारुदत्त शिंदे, डाॅ. शीतल सहानी यांच्याशी विचारविनिमय करुन मुंबईच्या नायर रुग्णालयात प्लाझ्मा डोनेशनचा निर्णय घेतला. याठिकाणी डाॅ. रमेश वाघमारे यांच्या टीमने आवश्यक त्या चाचण्या करताच जाधव यांना प्लाझ्मा डोनेशन करण्यास संमती दिली. त्यानुसार ४५० एमएल प्लाझ्मा डोनेशन त्यांनी केले. त्यातून कोरोना रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. कोरोना बाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी नम्रता भोसले-जाधव यांनी आपला प्लाझ्मा दान करून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
प्लाझ्मा दान, श्रेष्ठदान
आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढला जातो. यामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडी गरजु रुग्णाला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. प्रत्येक रूग्णांने बरे झाल्यानंतर प्लाझ्मा डोनेशनचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना या डोनेशन दिलेल्या प्लाझ्माचा फायदा होतो. बरे झालेल्या रूग्णाच्या विविध चाचण्यांनंतर हे प्लाझ्मा डोनेशन डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जाते व ते अत्यंत सुरक्षित असून या साठी प्रत्येकानेच पुढाकार घेतल्यास खऱ्या अर्थाने कोरोनावर मात करणे सोपे जाईल. यापुढेदेखील प्लाझ्मा डोनेशनकरता जनजागृती करण्याचा मी निश्चय केलेला आहे. प्लाझ्मा डोनेट करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास मला संपर्क करावा.