ठाणे - झटपट पैसे कमवून मजा करता यावी यासाठी एका युवकाने नामी शक्कल लढवली होती. यातून त्यांने बँक ग्राहकांना लाखोंचा गंडाही घातला आहे, परंतु, पोलिसांनी कसून तपास करत अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव बँकेची ATM कार्ड स्पीड पोस्टने पाठविली जातात. तर त्याचा पिन इतर माध्यमातून पाठविला जातो. ऍक्सिस बँकेच्या तब्बल 16 ग्राहकांनी आपल्याला ATM कार्ड मिळाले नसताना देखील आपल्या खात्यातून 1.62 लाख रुपये काढल्याची माहिती दिली. श्रीनगर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ताबडतोब गुन्हा दाखल केला.
चोरीच्या ATM मधुन काढले पैसे - पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीगारांच्या मदतीने कसून तपास करत मुंब्रा रेतीबंदर येथून तोहीद अजीम शेख या 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. तोहीद हा मुंब्रा येथील आनंद कोळीवाडा येथील रहिवासी असून मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशिक्षित असल्याचे कळले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण काही महिने पोस्टात कंत्राटी कामगार म्हणून काम करताना ही ATM कार्ड चोरल्याची कबुली दिली. कार्ड चोरल्यावर सदर बँक ग्राहकाला आपण बँकेचे अधिकारी बोलत असून कार्ड ऍक्टिवेशन च्या बहाण्याने त्यांच्याकडून त्यांचा सिक्रेट पिन नंबर काढून घेत असे. त्यानंतर तो त्या ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढून पुरावे नष्ट करण्यासाठी कार्ड खाडीत फेकून देई अशी माहिती तोहीद याने पोलिसांना दिली.
अनेक कार्ड केले जप्त - त्याच्याकडून ऍक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया व इतर असे एकूण 86 ATM कार्ड व चोरीच्या पैश्यातून विकत घेतलेली अंदाजे रू. २,५२,000 किमतीची कारही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हेही वाचा - Bank Holidays in April : एप्रिलमध्ये 15 दिवस बँकांना सुटी