ठाणे - ठाणे पालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामात ( Thane Corporation Smart Cirty Work ) अनेक आरोप - प्रत्यारोप करण्यात आले. त्याप्रकरणी केंद्र सरकारची चौकशी सुरू असताना कार्यकारी अभियंता म्हणून जबाबदारी असलेल्या सुधीर गायकवाड या अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले ( Officer Sudhir Gaikwad Suspension ) आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे शहरात सुरू असलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ही कारवाई केली आहे.
'या' प्रकरणात केली हयगय - ठाणे शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे सुरू आहे. कोपरीमध्ये बीएसयूपीच्या इमारती बांधल्या जात असून, तेथील इमारतीचा स्लॅब नुकताच कोसळला होता. या प्रकरणात हयगय केल्याचा ठपका ठेवत पालिकेच्या स्मार्ट सिटीचे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याकडे असलेल्या पदाचा कार्यभार तूर्तास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विकास ढोले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे .
स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम रखडले - केंद्र आणि राज्य सरकारकडून ठाणे शहराच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी १ हजार १११ कोटी २७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षात स्मार्ट सिटी योजनेचे बहुतांशी मोठे प्रकल्प रखडले आहे. एकूण ३५ कामांपैकी अवघे ९६ कोटी २५ लाख रुपये खर्चाची २० कामे पूर्ण झाली आहेत. तर, पाच वर्षात १ हजार १११ कोटी २७ लाख खर्चापैकी अवघे ३५२ कोटी ४१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छ पर्यावरण, खात्रीशीर शुद्ध पाणी, विजेची शाश्वत उपलब्धता, सॅनिटेशन, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प, प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, माहिती-तंत्रज्ञान सुविधा, ई-गव्हर्नन्स, नागरी सुरक्षितता, पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष, अपारंपरिक ऊर्जा, पाण्यासाठी अत्याधुनिक मीटर, स्मार्ट पर्किंग, अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन आदींचा समावेश केला आहे.
विरोधकांनी केल्या होत्या केंद्र सरकारकडे तक्रारी - अगदी सुरुवातीपासून स्मार्ट सिटीच्या कामात दिरंगाई सुरु असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ठाणे पालिकेच्या अनेक महासभेत स्मार्ट सिटीच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आवाज उठवला जात होता. तसेच, महासभेत स्मार्ट सिटीचे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करण्यात आले होते. तर, भाजपने देखील केंद्र सरकारकडे तक्रार करून या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
हेही वाचा - Satej Patil : सतेज पाटलांनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली; म्हणाले, 'भाजपने इतिहासाची बदनामी...'