ठाणे - हेल्मेट घालून दुचाकी चालवत होता म्हणून एका २२ वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली. या तरुणाने मारहाण करणाऱ्या त्या व्यक्तीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यांनतर त्याचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करून खडकपाडा पोलीस ठाण्यात त्या टवाळखोरविरोधात तक्रार दाखल केली. न्याय मिळण्यासाठी त्याने 'दादागिरी कधी थांबणार' असा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केल्याचे समोर आले आहे. स्वप्नील साळुंखे, असे पीडित तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - Breach of Curfew in Bhiwandi : भिवंडीत जमावबंदीसह संचारबंदीचे तीन तेरा
हेल्मेट का घातले यावरून झाला वाद
कल्याण - पडघा मार्गावरील कल्याणच्या दिशेने स्वप्नील साळुंखे हा मंगळवारी दुपारच्या सुमारास येत होता. त्याच सुमाराला महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यात थांबवून एका कार चालकाने त्याला शिवीगाळ करत या परिसरात हेल्मेट घालून दुचाकी चालविण्याची परवानगी नाही. हेल्मेट काढ, असे धमकावले. मात्र, आपण नियमानुसार हेल्मेट घातल्याचे सांगत स्वप्नीलने हेल्मेट काढण्यास नकार दिला. त्यामुळे, संतापलेल्या वाहनचालकाने कारमधून उतरून त्याला मारहाण करत त्याचे हेल्मेट जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्याचा मोबाईल देखील काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वप्नीलने स्वताची कशीबशी सुटका करून घेत याप्रकरणी खडकपाडा पोलिसात सदर वाहनचालकाच्या कार नंबरसह तक्रार दाखल केली आहे.
घटनेची चौकशी करून कारवाई होणार
विशेष म्हणजे, या मार्गावर नेहमीच टवाळखोर तरुणांकडून प्रवाशांना नाहक मारहाण व शिवीगाळीचे प्रकार घडतच असतात. त्यातच स्वप्नीलने घडलेल्या घटनेचा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून त्याने हा संपूर्ण व्हिडिओ युट्यूबवर शेअर करत ही 'दादागिरी कधी थांबणार' असा सवाल केला आहे. मात्र, पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून केवळ एन.सी दाखल केली. तर, याबाबात सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्याकडे विचारांना केली असता, या घटनेची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.