ठाणे - भाजपचे मोदी सरकार देशात आल्यापासून या सरकारच्या काळात दलित, आदिवासींसह मुस्लीम समुदायावर दडपशाहीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वंचित आघाडीच्या माध्यमातून अशा जातीयवादी आणि मनुवाद्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु आणि प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी कल्याणात केले.
सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्यात बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, वंचित आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटना एका जातीच्या किंवा धर्माच्या नाहीत. त्या सर्वांसाठी आहेत. त्यामुळे वंचित आघाडी आणि सम्यक विद्यार्थी संघटनांमध्ये सर्व धर्माचे आणि जातीच्या लोकांनी यावे. वंचित बहुजन आघाडीला भाजपची 'बी टीम' बोलणे चुकीचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी चांगली कामगिरी करणार आहे. यावेळी सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध संघटनेतील शेकडो विद्यार्थ्यांनी सम्यक विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला.
मेळाव्याला सुजात आंबेडकरांना पाहण्यासाठी तसेच संवाद साधण्यासाठी विद्यार्थीवर्गासह आंबेडकरी जनताही मोठ्या संख्येने उपस्थित होती. या मेळाव्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र सचिव महेश भारतीय, वंचित आघाडीच्या प्रदेश प्रवक्ते दिशा उर्फ पिंकी शेख, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रतिक साबळेंसह व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते.