ठाणे - भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे तळ अधिक एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एका सिक्युरिटी गार्डचा ढिगाऱ्याखाली दबल्याने जागीच मृत्यू झाला होता. तर त्यानंतर गंभीर अवस्थेत ढिगाऱ्याखालून काढलेल्या दुसऱ्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृत्यू संख्या दोन झाली आहे. तर सहा जण जखमी झाले होते. या सर्वांना आठ तासाच्या मदतकार्य नंतर सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू होते अनधिकृत बांधकाम
दापोडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे गोदाम संकुल आहे. या गोदामात तळ मजल्यावर शॅडोफॅक्स ऑनलाइन पार्सल कंपनी असून या कंपनीत ऑनलाइन साहित्य पार्सल करण्यात येत होते. सुमारे ७०हून अधिक कामगार या कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळत असून सोमवारी दुर्घटना झाल्यावेळी या कंपनीत सुमारे ५० ते ५५ कामगार उपस्थित होते. तर पहिल्या मजल्यावर मार्क इम्पेक्स ही टीव्ही व इलेक्ट्रॉनिक साहित्याची कंपनी होती. ज्यात सहा ते सात कामगार काम करीत होते. टीव्ही कंपनीतील हे सर्व कामगार सुरक्षीत आहेत. मात्र गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकामदेखील सुरू होते. सुदैवाने हे मजूरदेखील या दुर्घटनेत वाचले असल्याचे बोलले जात आहे.
कामगारांना बाहेर काढत असतांना सौरभ त्रिपठीचा मृत्यू
घटनेच्या दिवशी तळ मजल्यावर काम सुरू असताना अचानक गोदामाची इमारत कोसळली व परिसरात व कंपनीत एकच गोंधळ उडाला होता. यावेळी २५ ते ३० कामगार धावत बाहेर पळाले. यावेळी या कंपनीत सिक्युरिटी काम करत असलेल्या सौरभ त्रिपठी या कामगाराने सुमारे २० ते २५ कामगारांना बाहेर काढले व इतर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढत असतांना सिक्युरिटी कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आज उपचारादरम्यान ऋतिक पाटील या कामगाराचा मृत्यू झाला. दुर्घटनेत सुनील कुमरा, कल्पना पाटील, रोशन पागी, अक्षय केनी, शैलेश तरे व इतर एक असे सहा जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात व ठाणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोसळलेला काही भाग कंटेनरवर पडल्यामुळे दिसला बाहेर पडण्याचा मार्ग
या दुर्घनेत कामगारांनी पार्क करून ठेवलेल्या दुचाकींसह माल भरणे व उतरण्यासाठी गोदामाला लागलेल्या कंटेनरवर इमारतीचा काही भाग कोसळल्याने या वाहनांचेदेखील मोठे नुकसान झाले होते. विशेष म्हणजे गोदामाचा कोसळलेला काही भाग कंटेनरवर पडल्यामुळे आतील काही कामगारांना बाहेर पडण्याचा मार्ग दिसला आणि त्यांचा जीव वाचला. या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.