ठाणे - महानगरपालिकेच्या नावे ओळखपत्र छापून त्याचा गैरवापर करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या लोगोचा वापर करून ओळखपत्र बनवण्याचे गैरप्रकार वाढल्याने पालिकेने सक्तीचे पाऊल उचलले आहे. यासंबंधी महानगरपालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत. याआधी सुद्धा महानगरपालिकेचे लेटरहेड पत्रक छापून अनेक गैरप्रकार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विभागांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी कामगार भरती करण्यात आली होती. अशा कामगारांना महानगरपालिकेतर्फे विशेष ओळखपत्र देण्यात आली होती. परंतु त्या ओळखपत्राचा गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी या ओळखपत्राचा गैरवापर करणाऱ्या एकाला रंगेहात पकडले व त्याच्यावर कारवाईची मागणी केली. पालिका आयुक्तांनी याप्रकारची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त तथा जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी या प्रकाराची दखल घेत आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करणार असल्याचे मान्य केले.
ओळखपत्राचा वापर कशासाठी
लॉकडाऊनच्या काळात बनावट ओळखपत्र तयार करून बाहेर फिरण्यासाठी, रेल्वे प्रवास करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या नावाने ओळखपत्र तयार करण्यात आली. टोल वाचवण्यासाठी काही वाहनचालक चक्क वाहनावर महापालिकेचा लोगो लावल्याचे उघडकीस आले. हे थांबवण्यासाठी पालिकेने कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.