ठाणे - महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष लोटले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात राज्यातील अनेक विकास कामे मार्गी लागणार असून कोरोना काळात देखील या सरकारने चांगले काम करून दाखवले, असे ते म्हणाले.
वाढीव वीजबिलांचा मुद्दा
कोरोनाकाळात वाढीव वीजबिलं आल्याने सर्वसामान्यांमध्ये असंतोष आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने या बिलांची रक्कम भरण्याची सक्ती केली. यातून विरोधीपक्षाने संधी साधत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भाजपा, मनसे यांनी राज्यभरात मोर्चे काढले. वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. त्यासंदर्भात बोलताना. वाढीव वीज बिलांच्या प्रश्नांसंदर्भात सरकार सकारात्मक असून कॅबिनेटमध्ये ही रक्कम करमी करण्यासाठी प्रस्ताव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने लवकरच वाढीव वीज बिलांसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षण मार्गी लावणार
मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. विधीमंडळाने मराठा समाजाला आरक्षण पारित केल्यानंतरही याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. यावर बोलताना, आरक्षणाबाबत राज्य सरकार उत्तम काम करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. केंद्र सरकारने देखील राजकारण बाजूला ठेऊन मराठा आरक्षणाचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिलाय. मराठा आरक्षणाच्या विषयात केंद्र सरकार आडकाठी आणत असल्याचा आरोप नगरविकासमंत्र्यांनी केलाय. केंद्राने आरक्षणाच्या मुद्द्यात आडकाठी आणू नये असे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय ठाकरे सरकार शांत बसणार नाही, असे म्हणत त्यांनी आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे.
वर्षपूर्ती समाधानकारक
राज्य सरकारने पूर्ण केलेले सत्तेचे एक वर्ष हे समाधानकारक आहे. यापुढे देखील मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरूच राहतील, असे सांगताना एकनाथ शिंदे यांनी आगामी काळात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यासोबत कोविड काळात आणि त्यानंतर सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी कशाप्रकारे काम करणार आहे, याची माहिती दिली.