ठाणे - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात पोलिसांकडून 'ई-चलान'च्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. या कारवाईला 14 फेब्रुवारी 2019ला सुरुवात झाली. ठाण्यात दर दिवशी 'ई-चलान'च्या माध्यमातून 2500 वाहन चालकांकडून दंड आकारला जातो. मात्र नंतर त्याची वसुली होत नसल्याने, आता पोलिसांकडून दंड वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
फेब्रुवारी 2019पासून ते आतापर्यंत 'ई-चलान'च्या माध्यमातून 22 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात 10 कोटींचीदेखील वसुली झाली नाही. त्यामुळे आता ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. १ डिसेंबरनंतर ५ हजारांपेक्षा अधिक वसुली शिल्लक असेल तर वाहतूक पोलीस आता धडक कारवाई करणार आहेत. यासाठी शहरातील नाक्यांवर पोलिसांकडून वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांकडून जनजागृती मोहीम
दरम्यान नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीमदेखील राबवण्यात येणार आहे. तसेच ज्या पोलीस अमलदारांकडे ई-चलान मशीन आहे, त्यांच्याकडे राज्यातील कुठल्याही चलनाची रक्कम डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे भरता येणार आहे. दुसरीकडे राज्य शासनाच्या वेबसाईटवर जाऊन देखील ही दंडाची रक्कम चालक भरू शकतात.
13 कोटींची थकबाकी
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी जवळपास २२ कोटींचा दंड ई-चलानच्या माध्यमातून आकारला आहे. मात्र आतापर्यंत केवळ 10 कोटी रुपयांचीच वसुली झाल्याची माहिती वाहतूक उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. दंडाची रक्कम न भरल्यास कडक कारवाई करण्यात येणार असून, यामध्ये परवाना रद्द करने, ते वाहन जप्तीपर्यंतच्या कारवाईचा समावेश असल्याचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा - पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा 'या' तारखेपर्यंत बंद राहणार, पालकमंत्री तटकरे यांचे निर्देश
हेही वाचा - पत्रीपुलाच्या कामाचे श्रेय केंद्र सरकारचे; इतर पुलांचे काम कधी पूर्ण करणार? भाजपचा सवाल