ठाणे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे पोलिसांकडून विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांवर खंडणी, पैसे वसुली आणि धमकावणे प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या एसआयटीच्या माध्यमातून दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास आणि पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
तपासासाठी SIT स्थापन -
केतन तन्ना, सोनू जालान आणि रियाज भाटी यांच्या तक्रारीनुसार त्यांचे जबाब नोंदवून ठाणे नगर पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यात आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. गुन्ह्याची गंभीरता आणि तक्रारदारांची पडताळणी करण्यासाठी ठाणे पोलिसांनी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांविरोधात ठाणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
काय आहे प्रकरण?
2018 मध्ये ठाणे पोलीस आयुक्तपदी असणाऱ्या परमबीर सिंह यांच्याकडून मोक्का खाली सोनू जालान याच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर तब्बल 3 कोटी 45 लाख रुपये उकळण्याचा आरोप सोनू जालान याने केला आहे. यासंदर्भातील तक्रार अर्ज क्रिकेटबुकी सोनू जालान याने मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व पोलीस महासंचालक यांना केल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे पोलीस आयुक्त असताना क्रिकेटबुकी सोनू जालान याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळेस ठाणे पोलीस विभागातील तत्कालीन पोलीस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा व कोथमिरे नावाच्या अधिकार्यांवरसुद्धा सोनू जालान याने आरोप केले आहेत. याबरोबरच केतन तन्ना नावाच्या व्यक्तीने परमबीर सिंह यांच्यावर आरोप करत त्याच्याकडून 1 कोटी 25 लाख रुपये धमकी देऊन वसूल केल्याचा आरोप त्याने केला. यासंदर्भात राज्य सरकारकडून योग्य ती चौकशी करण्यात यावी व यामध्ये दोषी आढळणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रिकेटबुकी सोनू जालान व केतन तन्ना या दोघांनी केली आहे.
हेही वाचा - परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी