ठाणे - घोडबंदर रोडवरील पादचारी पुलाचे रखडलेले काम सुरू न झाल्याने पुलासाठी पाठपुरावा करणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चांगलेच संतप्त झाले. आज सरनाईक यांनी चक्क पालिका मुख्यलायत येऊन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या दलनातच अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हाती घेतलेले प्रकल्प कित्येक वर्षे पूर्ण केले जात नसल्याने सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - भिवंडीत ३२ किलो गांजासह ४२ लाखांचा गुटखा जप्त; आठहून अधिक गुन्हेगारांना अटक
ठाणे शहराचा विस्तार हा घोडबंदर पट्ट्यात मोठ्याने होत असल्यामुळे तेथील लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सुसाट चालणाऱ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. या अपघातांवर तोडगा म्हणून ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घोडबंदर रस्त्यावर पादचारी पूल बांधण्याचा निर्णय २०१५ साली घेतला होता. ठाणे मनपाने तत्त्वज्ञान विद्यापीठ, कासारवडवली या दोन ठिकाणी पादचारी पुलांची कामे काही वर्षांपूर्वी पूर्ण केली, मात्र उर्वरित पुलांच्या बांधकामाची दिरंगाई गेली कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे नाराज झालेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका मुख्यालयात येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
घोडबंदर रोडवरील पादचारी पूल आणि उपवन तलाव परिसरातील घाटांचे सुशोभिकरणाचे रखडलेले काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या कार्यालयात प्रताप सरनाईक यांनी अपूर्ण कामांची माहिती दिली. यावेळी नगर अभियंता अर्जुन आहेर, लेखापरीक्षण अधिकारी संजय पतंगे, लेखाधिकारी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
..अखेर महापालिका निधीतून या पुलांचे काम करण्याचा निर्णय
पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी ठाणे महापालिका तत्त्वज्ञान विद्यापीठ, आर मॉल, ब्रह्मांड जंक्शन, कासारवडवली साईनाथ क्रॉस रोड या ठिकाणी चार पादचारी पुलांचे काम मार्च २०१५ अखेर पूर्ण करणार होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे गायमुख, भाईंदरपाडा, विजयनगर, साईनगर, चेना ब्रिज येथे हे पूल बांधणार होते. ठाणे हद्दीत बांधण्यात येणारे चार पूल जाहिरातीचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या तत्वावर देण्यात येणार होते. परंतु, ठाण्यात बेकायदा लावणाऱ्या होर्डिंगबाजांमुळे जाहिरात व्यवसाय धोक्यात असल्याने कोणतीही जाहिरात कंपनी हा ठेका घेण्यास धजावली नाही. त्यामुळे, हे पादचारी पूल होणार का? असे प्रश्न निर्माण झाले होते. अखेर महापालिका निधीतून या पुलांचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मेट्रोचे काम सुरू झाल्यामुळे पादचारी पुलांची कामे बंद
ठाणे पालिकेने सन २०१४ - २०१५ मध्ये पादचारी पुलांसाठी १० कोटी निधीची तरतूद केली होती. त्यापैकी घोडबंदर रस्त्यावरील दोन पुलांसह जुपिटर हॉस्पिटल, आनंदनगर येथील पुलांचे काम सुरू झाले आहे, तर उर्वरित पुलाच्या कामाची डिजाइन अंतिम करण्याचे काम सुरू आहे. वेळेत काम सुरू होते. दरम्यानच्या काळात मेट्रोचे काम सुरू झाल्यामुळे पादचारी पुलांची कामे बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, पूल बांधायचे असल्यास एमएमआरडीएची एनओसी घ्यावी लागेल, असे प्रशासनाकडून सुचवण्यात आले.
प्रताप सरनाईक यांचा पाठपुरावा
जवळपास पाच वर्षांपासून सरनाईक या पादचारी पुलांसाठी पाठपुरावा करत असून त्यांना एमएमआरडीएकडून एनओसी मिळवण्यासाठी तीन वर्षे लागली. त्यानंतर २०१८ साली महासभेची मंजुरी घेऊन तीन पुलांसाठी निविदा काढण्यात आली. ठकेदार नियुक्त करण्यात आला, मात्र त्यानंतर अद्याप काम सुरू होऊ शकलेले नाही.
हेही वाचा - ...तर पाचव्या अन् सहाव्या रेल्वे रुळांचे काम थांबवू - गृहनिर्माण मंत्री आव्हाड