ठाणे - मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी महादेव कोळी समाज मात्र नाराज झाला आहे. असे वक्तव्य शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी केले आहे. ठाणे येथे महादेव कोळी समाज संघ यांच्यामार्फत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वैभव पिचड यांना कोळी, आगरी समाजाचा विरोध
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्यासह भाजप प्रवेश केला आहे. परंतू पिचड यांच्या भाजप प्रवेशामुळे महादेव कोळी समाज नाराज झाला आहे. महादेव कोळी समाजाचे नेतृत्व करणारे आणि शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी पिचड यांच्या भाजप प्रवेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आजपर्यंत मधुकर पिचड यांनी महादेव कोळी समाजाला उद्वस्त करण्याचे काम केले आहे. जर भाजपमध्ये राहून त्यांनी पुन्हा या समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर पिचड आणि त्यांच्या पुत्राला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अनंत तरे यांनी दिला आहे.
सहधर्मादाय आयुक्तांचा ऐतिहासिक निर्णय
एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या दानपेटीमधील केवळ २५ टक्के उत्पनाचा वाटा देवीच्या पदरात पडत होता. उर्वरित सर्व दान हे गुरव (पुजारी) यांना मिळत होते. अनंत तरे यांनी अनेक वर्ष याविरोधात लढा दिल्यानंतर त्यांच्या लढ्याला यश आले आहे. देवीच्या मंदिरात पुजाऱ्याकडून दानपेटीवर ठेवले जाणारे ताट कायमचे बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय सहधर्मादाय आयुक्तांनी दिला असल्याची माहिती तरे यांनी यावेळी दिली. ठाणे येथे महादेव कोळी समाज संघ यांच्यामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.