ठाणे - ठाण्यात २० दिवसापूर्वी शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख पदाचा राजीनामा देणारे प्रकाश पाटील अखेर आज शिंदे गटात सामील झाले (Prakash Patil in Shinde Group). प्रकाश पाटील हे शिंदे गटात सामील झाल्याने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रकाश पाटील यांची आज पहाटे ३ वाजता उपनेते पदी नियुक्ती केली आहे.
शिवसेनेच्या जिल्हा ग्रामीण प्रमुख पदाचा राजीनामा का - विधानपरिषद निवडणुकीनंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी राज्यात सत्ता संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक स्थानिक स्वराज संस्थामधील लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील पाचही आमदारांनी शिंदे गटाला साथ दिली. एवढंच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट उदयास आले. कालपर्यंत ग्रामीण भाग पिंजून काढून शिवसैनिकांना शिवसेनेत राहण्यासाठी शपथ देत होते. तेच ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या अचानक २० दिवसापूर्वी दिलेल्या राजीनामा नाट्यानंतर शिवसेना गोटात खळबळ उडाली होती. पक्षश्रेष्ठी अविश्वास दाखवत असल्याने आपण जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचे पाटील यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना सांगितले होते.
३५ वर्षे शिवसेना शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत काम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे त्यांच्या गटात सामील झाले. मात्र त्यांच्या बंडखोरीचा आणि माझा कोणताही संबंध नसताना देखील पक्ष नेतृत्वासह पदाधिकारी यांनी संशय व्यक्त करीत माझ्यावर अविश्वास व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपण व्यथित झालो. तब्बल ३५ वर्षे शिवसेना संघटनेत शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत काम करीत आहे. सध्या पक्ष नेतृत्वाकडून संघटनेच्या कामातून आपणास खड्यासारखे बाजूला करण्याचे प्रयत्न काही हितशत्रू पक्ष नेतृत्वाच्या साथीने करीत आहेत. त्यामुळे अपमानित होऊन संघटनेत राहण्यापेक्षा स्वाभिमान जपत राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले होते (Shiv Sena Thane Rural District Rural Chief).