ठाणे - ठाण्यातील खारेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचा कॅम्प भरवण्यात आला असताना त्या आधीच राष्ट्रवादीने लोकांना लसीकरण करण्याचे आवाहन करणारे बॅनर कळवा खारेगाव भागात लावण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून राष्ट्रवादीचे बॅनर फाडून टाकण्यात आले. यामुळे राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट केले आहे. कोणी गावगुंडांनी लसीकरणाचे बॅनर फाडले असेल तर पोलिसांनी कारवाई करा, अन्यथा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी उग्र भूमिका घेतल्यास जबाबदारी आपली नसल्याची भूमिका आव्हाड यांनी घेतली.
दुसरीकडे शिवसेनेने देखील याच लसीकरण केंद्रावर व अन्य ठिकाणी बॅनरबाजी केल्याचे चित्र दिसले. यावर माजी खासदार व ठाणे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील सेनेला आणि पालिका प्रशासनाला सवाल विचारला आहे. त्यामुळे एकीकडे बॅनरबाजी आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे फाडण्यात आलेल्या बॅनरमुळे संताप राष्ट्रवादीमध्ये दिसून येत आहे.
हेही वाचा - प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाच्या संख्येत ठाण्यात घट दिसून येत आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण करताना नागरिक दिसत आहेत. त्यामुळे पालिकेच्यावतीने जरी खारेगाव भागात 10 हजार लसी पुरवण्याचे काम होत असले तरी यावर बॅनरबाजी करताना सेना आणि राष्ट्रवादी दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने नागरिकांना आव्हान करणारे बॅनर हा अज्ञात लोकांनी फाडला होता. त्याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत संताप व्यक्त करत, पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे. तर याबाबत समाजकंटकांना पकडून कारवाई केली नाही तर आम्ही 24 तासात पोलीस ठाण्याला घेराव घालू आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर याला सर्व जबाबदार पोलीस असतील. असा इशारा ठाणे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. तसेच पालिका प्रशासन लसीकरण करत असताना मात्र सेनेकडून खारेगाव लसीकरण ठिकाणी बॅनरबाजी दिसत आहे. त्यामुळे आनंद परांजपे यांनी सेनेवर टीका करत प्रशासनाला देखील सूचना दिल्या आहेत.
राष्ट्रवादीची शिवसेना आणि आयुक्तांवर टीका -
शिवसेनेने लसी बनवण्याचे काम कधीपासून चालू केले? हे लसीकरण प्रशासन आणि महाविकास आघाडीमार्फत पालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे हे श्रेय महाविकास आघाडीला असून, नुसते सेनेला नाही, असा सवाल आनंद परांजपे यांनी सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ विपीन शर्मा हे काय लवकरच शिवसैनिक होणार का? असा टोला देखील परांजपे यांनी पालिका आयुक्त यांना लगावला आहे.
विनाकारण टीका योग्य नाही -
तसेच विरोधी पक्ष टीका करत असतो, परंतु ती टीका विधायक असली पाहिजे. सरकार चांगले काम करत आहे. कोविडमध्ये राजकारण नको, आम्ही शेतकऱ्यांचे आणि विकासाचे कामे करत आहोत. आम्ही जिथे चुकेल तिथे विरोध केला तर चालेल, मात्र सातत्याने विनाकारण टीका करणे हे बरोबर नसल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - कलम 370 हटल्याने काश्मीर घाटीत विकासाचे मार्ग खुले झाले - मोहन भागवत