ठाणे - महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर कोविड लस देण्यासाठी टोकन दिले जात असताना सुद्धा अर्ध्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. मग आलेला लसीचा साठा जातो कुठे? असा सवाल शिवसेनचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता, केंद्रावर आलेल्या लसी जातात कुठे? या लस खासगी रुग्णालयांना परस्पर विकल्या जातात का? असा आरोप भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी उपस्थित केल्यानंतर ठाण्यात आता लसींचा देखील काळाबाजार होत आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला.
ठाणे महापालिका हद्दीत लसीकरण मोहीम जोरदार सुरू असून घोडबंदर येथील आनंदनगर आरोग्य केंद्रावर लसीकरणाचा हिशोब लागत नाही. आरोग्य केंद्रावर लसीचा साठा येतो, आलेल्या साठ्याच्या अनुषंगाने नागरिकांना टोकन दिले जाते. मात्र तब्बल अर्ध्या नागरिकांना पुन्हा घरी पाठवले जात असल्याचा प्रकार नगरसेवक नरेश मणेरा यांनी उघडकीस आणला आहे. या संदर्भात मणेरा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला जाब विचारला होता. लसीकरण केंद्रावर 200 लस आल्या की फक्त 100 लोकांना लस का दिल्या जातात? असा सवाल देखील मणेरा यांनी उपस्थित केला. हा गंभीर प्रकार असून लवकरात लवकर याची चौकशी केली जाईल असे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिकेत गुरुवारी ऑनलाइन पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत लसीकरणाबाबत झालेल्या या आरोपामुळे प्रशासनाची कोंडी झाली असून भाजपचे सदस्य भरत चव्हाण यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर सभापती संजय भोईर यांनी यासंदर्भात तातडीने बैठक बोलावून संबधित लसीकरण केंदावरील डॉक्टर, नर्स व अधिकाऱ्यांनाही बोलवण्याचे आदेश दिले.
सत्ताधारी शिवसेना अडचणीत
ठाणे महापालिका क्षेत्रात लसीकरण मोहिमेत सावळागोंधळ सुरू असून लसींचा साठा संपल्याचे प्रकार अनेकदा घडले. बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला ट्वीट करून लसींचा पुरवठा वेळेवर करण्याची मागणी करून टोलेबाजी केली होती. मात्र, आता त्यांच्याच पक्षातील सदस्याने पालिकेची लसीचा हिशोब लागत नसल्याचे सांगितले असता कुठेतरी लसीचा काळाबाजार तर होत नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.