ठाणे - 'भाजप-शिवसेना महायुतीला लोकांनी स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यांनी ते मान्य करायला हवे, मुख्यमंत्री कोणाचाही होऊ दे त्याचे आम्हाला काय? सरकार स्थापन कधी करणार?, जनतेला मूर्ख बनवत आहेत. जनतेने दिलेला जनादेश फुटबॉलसारखा टोलवता आहात. ही लोकशाहीची पायमल्ली असून आता यांच्यातच लाथाळ्या सुरु आहेत. तर, पुढची पाच वर्षे कशी असतील हे दिसतंय', अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना-भाजप महायुतीला लगावली आहे.
हेही वाचा - पंढरपुरात विड्याच्या पानाला उच्चांकी दर, जुनवान पान बाजारास प्रारंभ
शिवसेना-भाजप महायुतीचा 50 - 50 फॉर्म्यूला ठरल्यावरून दोन्ही पक्षात भांडणे सुरु झाली आहेत. मात्र, अशापद्धतीचा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही, असा दावा भाजपकडून केला जात आहे. याबाबत बोलताना आमदार आव्हाड यांनी मार्मिक टिप्पणी करून युतीचे वाभाडे काढले. 'आमचे आधीच ठरले आहे, आम्ही सक्षम विरोधी पक्ष देणार, बाकी कोणताही विचार नाही, लोकांनी आम्हाला जनादेश दिला नाही आणि आम्ही ते मान्य केलं, पण यांचं तसं नाही. गेली पाच वर्षे यांनी भांडणात घालवली, आता सत्तास्थापनेच्या अगोदरच यांच्यात भांडण सुरू झाली. लोकांना मूर्ख बनवू नका, शेतकऱ्यांची काय अवस्था आहे?, लोकांचे काय प्रश्न आहेत, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अवकाळी पावसाने कोकण, मराठवाड्यात वाताहत झाली आहे. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या भांडणामुळे सगळा खेळखंडोबा करून ठेवलाय', अशी टीका आव्हाड यांनी केली. शिवाय, आठवड्यातील वार सत्तेसाठी वाटून घ्या आणि उरलेला रविवार आठवलेंना द्या, अशी मिश्किल टिप्पणीही आव्हाड यांनी केली.