ठाणे - कलम ३७० आणि राम मंदीर मुद्दा सत्ताधारी निवडणुकीच्या वेळी काढतात. कारण, लोकं त्यांच्यावर नाराज असतात. तेव्हा भावनिक मुद्दे काढले जातात. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या असे अनेक मुद्द आहेत ज्यावर सत्ताधारी उत्तर देऊ शकत नसल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरील गुन्हे लपवले याबाबत प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. मात्र, त्यांनी ती माहिती दिली पाहिजे होती, असे पवार म्हणाले.
हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन
सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना त्रास देण्याचे काम सध्या सुरु आहे. मुलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. ईडी अधिकाऱ्यांना वरुन सुचना आल्या असतील त्यामुळेच त्यांनी कारवाई केली आहे. ईडी, सीबीआयचा वापर सरकारकडून केला जात असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. अजित दादा हवालदिल नव्हते, त्यांचा प्रश्न मर्यादित असल्याचे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी भरलेला अर्ज हा लोकशाहीचा भाग आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी ठाकरे घराणेशाहीवर बोलणे टाळले.
हेही वाचा - शरद पवारांचा छळ केल्याचा बदला जनता घेईल, जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर
सत्ताधारी पक्षाचे अनेक लोक, गेल्या 3, 4 महिन्यापासून माझ्याच नाही, जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे आणि त्या त्या जिल्ह्यातील आमच्या नेत्यांच्या संपर्कात असतील. त्यांना कळले आहे की त्यांच्या पक्षात त्यांना भविष्य नाही. त्यामुळे अशा लोकांना जेव्हा संधी नाही तेव्हा ते पर्याय शोधत असतात, आणि हे लोक गेले वर्षभर आमच्याशी सुसंवाद साधून आहेत. मात्र, त्यांना तिकीट मिळेल की नाही ते मला माहित नाही, कोणाला तिकीट मिळते यामध्ये मी जात नाही. त्यासाठी आमची कमिटी आहे, आमची नवीन पिढी सर्व निर्णय घेते, असे शरद पवार यांनी सांगितले.