ठाणे - कल्याण पश्चिम भागातील खडकपाडा परिसरात असलेल्या एका हाय प्रोफाइल इमारतीमधील फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारख्या बनावट कोऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रांचा गोरखधंदा सुरु असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नायब तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी वर्षा राजेश थळकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कामेश चंद्रकांत मोरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर बनावट मतदार ओळखपत्रे!
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील हाय प्रोफाइल माधव संसार या सोसायटीत फ्लॅट नंबर बी 2 या ठिकाणी ही बनावट ओळखपत्रे आढळून आली आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नोव्हेंबर 2020 रोजी नगरसेवकांची राजवट संपुष्टात आली असून कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. मात्र, कोणत्याही क्षणी निवडणुका घोषित होण्याचीही शक्यता असून या दृष्टिकोनातून ही बनावट मतदार ओळखपत्र बनवली गेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण विभागातील निवडणूक आयोगातील नायब तहसीलदार वर्षा थळकर यांनी या प्रकरणी कामेश मोरे याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात कलम 465, 486, 484 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तो फ्लॅट नेमका कोणाचा?
कल्याणातील खडकपाडा येथील माधव संसार ही हाय प्रोफाइल रहिवाशांची सोसायटी असून यातील तक्रारीत या सदनिकांमध्ये राहत असणाऱ्या आरोपीच्या घरात बेडरूममध्ये भारत निवडणूक आयोगाचे बनावट ओळखपत्रे आढळून आल्याने हा फ्लॅट नेमका कोणाचा? या बाबत तर्कवितर्क काढले जात असून यामागे एखाद्या राजकीय नेता नाही ना याबाबत तर्कवितर्क काढले जात आहे. पोलीस तपासात नेमके काय निष्पन्न होते याकडे कल्याणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.