ठाणे - सावरकरनगर येथील भोलेनाथ सोसायटीत राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाला प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी जबरदस्ती होत होती. सुनेसह तिच्या माहेरच्या मंडळींनी त्यांना शिवीगाळ केली. यानंतर अपमान सहन न झाल्याने चंद्रभान चौबे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार 11 फेब्रुवारीला घडला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सूनेसह तिचे वडील आणि भाऊ अशा तिघांवर भादंवि ३०६,५०४,५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेला आठवडा झाल्यानंतर देखील आरोपींना अटक करण्यात आली नाही. मृत चंद्रभान चौबे (वय -७०) हे सावरकर नगर येथे भोलेनाथ सोसायटीत परिवारासह वास्तव्यास होते.
निवृत्त झाल्यानंतर सूनेकडून मालमत्ता नावावर करण्याची मागणी होत होती. त्यासाठी उत्तर प्रदेश येथून सून करुणाच्या माहेरच्या मंडळीने ठाण्यात येऊन मागणी केली. यानंतर करुणाच्या सासरच्या मंडळींनी दहा फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमधून घरच्यांनी बोलवले. तसेच त्यांच्यासोबत अन्य काही लोक आले. यांनी मलमत्ता नावावर करण्यासाठी तगादा लावला. तसेच यानंतर चौबे यांना शिवीगाळ केली.
या सर्व प्रकारानंतर अपमान झाल्याने 11 फेब्रुवारीला सकाळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून धोतराच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांनी आपल्या डायरीत तसेच घरातल्या भिंतीवर आणि बाथरूममध्ये माझ्या मृत्यूला सून करुणा, कनकलता, उमेश त्रिपाठी, मनोज त्रिपाठी जबाबदार असल्याचे स्केचपेनने लिहले आहे.
यानंतर त्यांना त्वरित लाईफ केअर रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी चौबे याना मृत घोषित केले. वर्तकनगर पोलीस ठाण्यात मृताची पत्नी विद्यादेवी यांनी पोलिसांना लेखी जबाब दिला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सून करुणा ,महेश त्रिपाठी, मनोज त्रिपाठी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी उत्तरप्ररदेशातील असल्याने ते फरार आहेत. या घटनेला आठवडा झाल्यानंतरही अद्याप त्यांचा शोध सुरू आहे.