ठाणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणुकीत प्रक्रिया जाहीर करण्यास सांगितल्याने ठाणे महापालिका आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती ( महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
यामध्ये ५ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती तर १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले. या निवडणूक आरक्षणामुळे बहुतांश इच्छुक सुखावले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा कायम असून निवडणूक दिवाळी दरम्यान होणार असल्याने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुकांना तयारीसाठी बराच अवधी मिळणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १८,४१,४८८ इतकी असून, त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या १,२६,००३, अनुसूचित जमाती ४२,६९८ इतकी आहे. या निवडणुकीकरीता तीन सदस्यीय प्रभाग असे एकूण ४६ प्रभाग व चार सदस्यांचा १ असे एकूण ४७ प्रभाग अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत.
या निवडणूकीकरीता एकूण सदस्य संख्या १४२ असून, त्यापैकी अनुसूचित जातीकरीता १० जागा व अनुसूचित जमातीकरीता ३ जागा आणि सर्वसाधारण १२९ जागा अशी वर्गवारी निश्चित करण्यात आलेली आहे. या १४२ जागांपैकी महिलांकरीता ५० % आरक्षणानुसार ७१ जागा महिलांकरीता राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून १० पैकी ५ जागा महिलांसाठी तसेच अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ३ जागांमधून २ जागा महिलांसाठी सोडत चिठ्ठीने आरक्षित करणार आल्या. अशा एकूण ७ जागा राखीव गटातील महिलांसाठी सोडत चिठ्ठीने आरक्षित करण्यात आल्या. उर्वरित ६४ महिलांसाठी राखीव जागेकरीता मा. राज्य निवडणूक आयोगाने १ ते ४७ प्रभागातील अ व ब जागेमधील ४७ जागा नेमून दिलेल्या आहेत. सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित करावयाच्या उर्वरित ३४ प्रभागाच्या ब जागेमधून सोडतीद्वारे १७ जागा सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित करण्यात आल्या आहेत.
खालील प्रभागमध्ये आरक्षण - यामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १२ अ, २३ अ, १५ अ, २९ अ आणि ३ अ आरक्षित करण्यात आले आहेत. तर अनुसूचित जमाती ५ अ व २९ ब या दोन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत तसेच १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी प्रभाग १ ब, २ ब, १३ ब, १६ ब, १८ ब, २० ब, २१ ब, २५ ब, २६ ब, ३२ ब, ३६ ब, ३९ ब, ४१ ब, ४३ ब, ४५ ब, ४६ ब आणि ४७ ब प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
प्रभाग रचनेत 'गोल्डन गॅंग सेफ' - आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या आरक्षण सोडत मध्ये दिग्गज नगरसेवकांच्या मनात आनंद दिसून आला आहे. महापालिकेत याच दिगग्ज नगरसेवकांची एक 'गोल्डन गॅंग' सक्रिय असून गेली अनेक वर्षे हीच दिग्गज मंडळी नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षातील ही मंडळी एकमेकांचे जिगरी मैत्री आहे. या सर्वाच्या प्रभाग रचना एकदम सेफ झाल्याने प्रस्थापितांबरोबर नवख्यांच्या या निवडणुकीत संधी मिळणार आहे. एकूणच या प्रभाग रचनेत प्रस्थापितांना कुठेही धक्का बसल्याचे दिसून आले नाही. तर काही भागात किंचित स्वरूपात मोडतोड झाल्याने दुसऱ्या प्रभागातही उभे राहण्याची संधी काहींना उपलब्ध झालेली आहे.
दिव्यात शिवसेनेचे 'धनुष्यबाण' - दिव्यात शिवसेनेला अपेक्षित असलेले प्रभाग आधीच तयार झालेले आहेत. आता आरक्षणातही शिवसेनेच्या बाजूने झुकते माप पडल्याचे दिसून आले आहे. प्रभाग क्रमांक ४३,४४ आणि ४५ मध्ये अपेक्षेनुसार आरक्षण पडल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले आदेश भगत आणि निलेश पाटील यांना देखील संधी मिळणार आहे. परंतु शिवसेनेच्या येथील तत्कालीन नगरसेवकांपैकी आता कोणाला संधी द्यायची असा पेच शिवसेनेपुढे असणार आहे. या ठिकाणी महिलांसाठी देखील आरक्षण पडले असल्याने त्याठिकाणी तत्कालीन नगरसेवकांच्या पत्नींला संधी द्यावी लागणार आहे.
दिग्गजांचे काय झाले -
- प्रभाग क्रमांक १ मध्ये नरेश मणेरा किंवा सिद्धार्थ ओवळेकर यांना संधी मिळू शकते, तर बाजूज्याचं प्रभागात दोघांपैकी एकाला संधी देण्यात येणार आहे.
- प्रभाग क्रमांक १८ महिला राखीव झाल्याने सुहास देसाई किंवा नजीब मुल्ला यांना संधी मिळणार आहे. किंवा या दोघांपैकी एकाला दुसऱ्या प्रभागात बस्तान बसवायला लागणार आहे.
- प्रभाग क्रमांक २७ मध्ये माजी महापौर नरेश म्हस्के आणि विकास रेपाळे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. परंतु दुसरीकडे प्रभाग क्रमांक २२ मध्ये या दोघांपैकी एकाला संधी मिळु शकेल.
- प्रभाग क्रमांक २९ मध्ये माजी उपमहापौर पल्लवी कदम यांना मात्र धक्का बसू शकतो,हा प्रभाग पुरुष असा आरक्षित झाल्याने पल्लवी कदम यांचे पती पवन कदम यांना संधी मिळू शकते.