ठाणे - देशभरातले वीज कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर (Power Employees Strike) गेले आहेत. वीज कंपन्यांचं खासगीकरण आणि विभाजनाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. ठाण्यात देखील वागळे इस्टेटमधील महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. देशभरातील वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या 39 संघटना संपावर ठाम आहेत. जवळपास 85 हजार कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. राज्यातल्या प्रमुख शहरांमधील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
संप अधिक तीव्र करणार : या संपावर गेल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता. सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील, यावर कर्मचारी ठाम आहेत. सरकारने वेळीच तोडगा काढला नाहीतर हे आंदोलन अधिक तीव्र होईल. सरकारला आमच्याशी बोलण्यासाठी यावेच लागेल. काही वाईट परिणाम झाले तर त्यासाठी सरकारच जबाबदार असेल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
याआधी झाले होते ठेकेदारांचे आंदोलन : काही दिवसांपूर्वी महावितरणच्या ठेकेदारांनी बिल मिळत नसल्याने आंदोलन छेडले होते. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे ठेकेदारांची बिल निघालेले नव्हती, यामुळे ठेकेदारांनी महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन केले होते. यापुढे कोणतेही काम घेणार नसल्याची भूमिकादेखील मांडली होती. मात्र, त्यानंतर परिस्थिती थोडीशी सुधारल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.