ठाणे- मुंबईहून कामगारांना मध्यप्रदेशमध्ये घेऊन जाणारे दोन ट्रक ठाणे वाहतूक पोलिसांनी गस्त घालताना नितीन कंपनी जवळ पकडले. यामध्ये एका ट्रकमधील तब्बल 8 जण मध्यप्रदेश येथे जात होते तर दुसऱ्या ट्रकमधून कल्याण येथे जाणाऱ्या 5 जणांना देखील वाहतूक पोलिसांनी पकडले. मुंबई गोरेगाव येथे काम करणारे 8 मजूर कामगार या ट्रकमधून मध्यप्रदेश येथे जात होते. 'कोरोना'मुळे लागू करण्यात आलेल्या 'लॉकडाऊन'नंतर खाण्या-पिण्याचे हाल होऊ लागल्याने हे कामगार मूळगावी परत जात असल्याचे आढळून आले आहे. याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तांब्यात घेण्यात आले आहे.
जगात कोरोनाने थैमान घातले असून देशासह राज्यात देखील रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रधुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देश 'लॉकडाऊन' करण्यात आल्यानंतर सर्व कामे ठप्प झाली. मुंबई, ठाण्यासारळया शहरात बाहेरील शहरे व राज्यातील अनेक नागरिक आहेत. 'लॉकडाऊन'नंतर त्यांचे हाल होऊ लागले असून, काही जण त्यांच्या कुटुंबियांकडे धाव घेऊ लागले आहे. मूळगावी परतण्यासाठी मिळेल त्या वाहनाने अथवा पायी गावी धाव घेऊ लागले आहेत. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले असले तरीही अनेकजण गावी जाताना दिसत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
दरम्यान, मंगळवारी नितीन जंक्शन येथे ठाणे वाहतूक विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना नाकाबंदी दरम्यान दोन ट्रक तपासणी केली. यावेळी या दोन वाहनांमध्ये काही नागरिक मिळाले. अधिक चौकशी दरम्यान हे कामगार असल्याचे चौकशीत समोर आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच नागरिकांची तात्पुरती सोय ठाण्याच्या शेल्टर होम मध्ये करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.