ठाणे - कल्याणच्या कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी घरातून पळालेल्या एका अल्पवयीन तरुणासह दोघा तरूणींना हुडकून काढण्यात यश मिळविले आहे. या तिन्ही जणांनी वेगवेगळ्या कारणांमुळे घर सोडून पळ काढला असला तरी पोलिसांनी मात्र सामाजिक बांधिलकीतून या तिघांचे मनपरिवर्तन करण्यातही यश मिळविले आहे.
आई रागवल्याने तरुणीने काढला घरातून पळ
पहिल्या घटनेत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ऋषिकेश सुरेश भवारी (24) या कल्याण पूर्वेकडील विजय नगरमधल्या साईप्रकाश सोसायटीत राहणाऱ्या तरूणाने तक्रार दाखल केली होती. त्याची 17 वर्षीय बहीण श्रुती ही 29 मार्च रोजी संध्याकाळी 5च्या सुमारास बेपत्ता झाली. ऋषिकेश हा लोकग्राम येथील पुस्तकाचे दुकानात गेला असताना श्रुती ही घरात कुणालाही काही न सांगता निघून गेली असल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या बहिणीस फुस लावून पळवून नेले असावे, असे त्याने सदर तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी पोलिसांनी 30 मार्च रोजी पहाटे 2 वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल केला. स.पो.नि. ए. आर. भिसे आणि त्यांचे पथक या तरुणीचा शोध घेत होते. शोध मोहिमेदरम्यान ही तरूणी तिची मलंगगड रोडला राहणाऱ्या एश्वर्या मल्ल्या नामक मैत्रिणीकडे राहत असल्याचा सुगावा लागला. तेथून या तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तिच्या आई-वडिलांसह कल्याण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याण अनिल पोवार यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. घरातील कामे करण्यासाठी आई रागवत असल्याने आपण वैतागून मैत्रीणीकडे रागाच्या भरात निघून गेले होते, असे या तरुणीने सांगितले. मात्र उपस्थित महिला पोलिसांनी या तरुणीचे मनपरीवर्तन तर केलेच, शिवाय तिच्या माता-पित्यालाही समजावून सांगितले. त्यानंतरच या तरूणीला तिच्या माता-पित्याच्या ताब्यात देण्यात आले.
मोबाइल लोकेशनवरून तरुणाला पुण्यातून आणले
दुसऱ्या घटनेत खडकपाडा पोलीस ठाण्यात 27 मार्च रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अपहरण केलेल्या मुलाचा शोध घेण्याकरिता सदर मुलाकडे असलेल्या फोनचे लोकेशन प्राप्त केले. हा मुलगा पुण्यातील खडकी येथे असल्याचे समजले. त्यावरून फौजदार एस. डी. चौरे यांच्या नेतृत्वाखाली हवा. पवार व शिपाई कांगरे यांनी खडकी गाठली. खडकी पोलिसांच्या मदतीने सदर मुलाच्या मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेतला असता हा मुलगा खडकीच्या बस स्टॅन्डवर आढळून आला. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत सदर मुलाचा शोध घेण्यात पोलिसांनी यश मिळविले. या मुलाला त्याची आई मीना साबळे हिच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मोबाइल संभाषण व मेसेजवरुन तरुणीचा शोध
तिसऱ्या घटनेत याच पोलीस ठाण्यात त्याच दिवशी 27 मार्च रोजी रितू शुक्ला (19) या बेपत्ता तरुणीच्या बाबतीत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तरुणीच्या मोबाइलवरून तिच्या कुंटुबांशी केलेले संभाषण व मेसेजवरुन, तिने केलेल्या पैशांच्या मागणीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर तरूणीचा शोध घेण्याकरिता पथक तयार करण्यात आले. या पथकाने तरुणीचे प्रथम मोबाइल फोनचे लोकेशन प्राप्त केले. ही कल्याण स्टेशन परिसरात असल्याचे समजल्यानंतर पो. हवा. गायकवाड, पो. ना. नाईक व महिला पो. ना. डोळस या पथकाने कल्याण बस स्टॅन्डसमोरील एका लॉजमधून तिला ताब्यात घेण्यात आले. ही तरूणी बेपत्ता झाल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत तिचा शोध लागला. या तरूणीला तिची आई ममता शुक्ला हिच्या ताब्यात देण्यात आले आहे.