ठाणे - एका वादग्रस्त ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकला. या बारमध्ये तोकडे कपडे परिधान करून बारबाला अश्लील व बीभत्स नृत्य करत असल्याचे पोलिसांना आढळले. या कारवाईत पोलिसांनी ७ बारबाला आणि मॅनेजर निशांत गौडा (वय,२४) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुध्द मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ३ येथील १७ सेक्शन परिसरात पॅराडाईस या नावाने वादग्रस्त ऑर्केस्ट्रा बार आहे. या बारमध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकांसमोर महिला गायक व बारबाला अश्लील नृत्य व अश्लील हावभाव आणि अंगप्रदर्शन करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी बारमध्ये छापा टाकला. त्यावेळी बारमधील मॅनेजर त्यांच्या आर्थिक फायद्याकरता बारमधील महिला नर्तीकांशी आपसात संगनमत करून बारमध्ये गाण्यावर गिऱ्हाईकांसमोर तोकडे कपडे परिधान करून अश्लील नृत्य करत असल्याचे आढळून आले होते.
या प्रकरणी पोलिसांनी ७ बारबाला, मॅनेजर निशांत गौडा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बारबालांना जामिनावर सोडण्यात आले आहे. मॅनेजर निशांत याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीसहवालदार. एस. एम. बेंद्रे करत आहेत.