ठाणे - बंडखोरांचा झेंडा शिवसेनेच्या उमेदवारावर प्रभाव पाडणार नसल्याचा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी प्रियंका चतुर्वेदी कल्याणमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नवीन महाराष्ट्राचे व्हिजन कसे असेल, याबद्दल सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील एकूण 18 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघात शिवसेना-भाजप नेत्यांनी बंडखोरी केली आहे. विशेष म्हणजे कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरुद्ध भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी बंड पुकारले आहे. तसेच कल्याण पूर्व मधील भाजपचे उमेदवार आमदार गणपत गायकवाड यांच्यासमोर शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करून भाजपालाच तगडे आव्हान दिले आहे.
हेही वाचा मी शरद पवारांसारख फक्त बोंबलत फिरत नाही - उद्धव ठाकरे
याच बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर, बंडखोर कितीही झेंडे फडकवत राहिले, तरी त्याचा सेनेच्या उमेदवारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या उमेदवारांचे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.