ठाणे - ठाण्यात मंगळवारी सायंकाळी ठाणे पालिकेकडून नितीन कंपनी जंक्शन मार्फत महामार्गावर खड्डे बुझवण्यासाठी डांबरीकरण करण्यात आले. हे डांबरीकरण करताना साचलेले पाणी देखील ठेकेदाराने काढले नाही. आणि अशाच परिस्थितीत पालिका अधिकाऱ्यांच्या समोर सुरू असलेल्या या कामाची पोलखोल ईटीव्ही भारतने केली होती. परिणामी आज याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे.
रस्त्याच्या डांबरीकरणाच्या नावाखाली पालिका पैशाची कशी उधळपट्टी करत आहे आणि त्याचा फायदा कसा ठेकेदार घेत आहे हे ईटीव्ही भारतने उघड केले होते. या प्रकारानंतर पालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी याबाबत प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. तर ठाण्यातील काँग्रेस पक्षाने हा घोटाळा असून त्यावर तात्काळ चौकशी करून अधिकाऱ्यांवर निलंबन करण्याची मागणी केली आहे.
ठेकेदाराला बिल मिळणार नाही
ज्या कंत्राटदाराने खड्ड्यांनी भरलेल्या पाण्यात डांबर टाकण्याचे काम केले. त्यासंबंधित ठेकेदाराला महापालिकेकडून समन्स देण्यात आला आहे. तसेच केलेल्या कामाचे बिल ठाणे पालिका प्रशासन काढणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.