ठाणे - महानगरपालिका क्षेत्रामध्ये पालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत भाजप गट नेते नारायण पवार यांनी पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. मात्र, पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सर्व रुग्णांना बेड उपलब्ध असल्याचा दावा केला आहे.
ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. शहरात आत्तापर्यंत 7 हजार 827 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 3 हजार 779 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत 263 जण कोरोनामुळे दगावले आहेत तर 3 हजार 785 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. महानगरपालिका स्तरावर उपाय योजना सुरू असून खासगी आणि शासकीय रुग्णायांत रुग्णांना योग्य ते उपचार मिळत आहेत. रुग्णालयांमध्ये बेडची संख्याही पुरेशी असल्याचे पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.
ठाण्यामध्ये १४ हजार ६ नॉन आयसीयू, २५२ आयसीयू बेड आहेत. न्यू होरायझन शाळेत एक हजार बेड असून नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात १ हजार २४ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. क्वारंटाईन करण्यासाठी काही खासगी हॉटेल ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती संदीप माळवी यांनी दिली.
माळवी यांनी दिलेल्या माहितीवर भाजप गट नेते नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे. ठाण्यात बेडची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करत आसल्याचा दावा पवार यांनी केला आहे.