ठाणे - पती-पत्नीचे भांडण कोणत्याही थराला जाऊ शकते. याचा प्रत्यय एका विचित्र घटनेतून आला आहे. पत्नी बाथरूमाला जाताना सोबत मोबाईल घेऊन गेल्याने पतीने तिच्यावर संशय व्यक्त करत मोबाईल तपासण्यासाठी मागितला. यावरून दोघांमध्येही वादाला सुरुवात झाली. यावेळी संतप्त झालेल्या पत्नीने पतीचा कडाडून चावा घेतल्याची विचित्र घटना कल्याणमध्ये घडली. जखमी पतीने पत्नीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दिलीप रेहनकर कल्याण (प) येथील खंडागळे सदनात कुटुंबासह राहतात. शुक्रवारी(दि.29नोव्हेंबर)ला सकाळी दिलीप यांच्या पत्नी नूतन मोबाईल घेऊन बाथरूममध्ये गेल्या. बाहेर आल्यानंतर दिलीप यांनी त्यांच्याकडे मोबाईल मागितला. मात्र, नूतनने मोबाईल देण्यास नकार दिल्याने पतीने मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर पत्नीने पुन्हा मोबाईल हिसकावून त्यांना शिवीगाळ केली. हाच प्रकार पुन्हा झाल्यानंतर पत्नीने पतीच्या हाताला कडकडून चावा घेतला. यामुळे दिलीप जखमी झाले.
या प्रकरणी दिलीप यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी पत्नी नूतन विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.